पुणे: मागील अडीच वर्षाच्या काळात ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. या दोन्ही नेत्यांनी एकदाही आरोप प्रत्यारोप करण्याची संधी सोडली नाही. त्या आरोप प्रत्यारोपची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहण्यास मिळाले आहे.
त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक सभेत खालच्या (टरबुज्या) स्तरावरील टीका करतात. हा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, ते दोन्ही मोठे नेते असून मनभेदाकडून मतभेदाकडे जाणे योग्य राहणार नाही. मला त्या दोघांच नात हे प्रेम आणि तिरस्कारा सारखे वाटते आहे. ते दोघे रागवून आणि तिरस्काराने एकमेकांना बोलतात. त्या दोघांच्या वादामध्ये मला द्वेष आणि त्वेष दिसून येतो, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
आणखी वाचा-गुंतवणुकीच्या आमिषाने निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दीड कोटींची फसवणूक
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मी देवेंद्रजीकडून तेवढे अपशब्द ऐकले नाही. उद्धव साहेबांचा ठाकरी बाणा असल्याने ते बोलत असतील. पण बाळासाहेब जरी रागवून बोलले तरी ते नंतर हसवून सर्व मिटवत होते. त्याप्रमाणे उद्धव साहेबांनी करावे, असे मला वाटत असल्याची भूमिका मांडत नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला.
या दोन्ही नेत्यामध्ये प्रेमळ कोण आहे. त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, जिथे तिरस्कार असतो तिथे प्रेम असतं आणि कायमच प्रेम राहीलं असतं, तर चांगलं झालं असतं. असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार असता कामा नये. असा अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सल्ला नीलम गोऱ्हे यांनी दिला.