पिंपरी : महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले नसताना उद्धव ठाकरे यांनी रायगड दौऱ्यात मावळमधून संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर करताच वाघेरे यांनी प्रचाराला सुरुवात केली. विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मावळ मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात दौरा केला. या दौऱ्यात वाघेरे यांची उमेदवारी जाहीर केली. ते विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर करताच वाघेरे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. वाघेरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचीही मदत होताना दिसत आहे.

हेही वाचा >>>पिंपरी : देहूरोडमध्ये ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाचा खून

मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आगामी निवडणुकीत देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खासदार म्हणून मी निवडून येईल. विरोधक कमळाच्या चिन्हावर लढल्यास उलट निवडणूक सोपी होईल. कारण, भाजपच्या विरोधात सुप्त लाट आहे. याचा फायदा मला होईल. मतदार मशालीला मतदान करतील, असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला.

महायुतीचे ठरेना

महाविकास आघाडीने उमेदवार निश्चित करत आघाडी घेतली असताना महायुतीमध्ये उमेदवारीवरून ताणाताणी सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मावळचे आमदार सुनील शेळके यांचा विरोध आहे. तर,भाजप कमळासाठी आग्रही आहे. त्यामुळेच महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्याची चर्चा आहे.

Story img Loader