राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच आपले मोठे बंधू राजेंद्र पवार यांना चिमटे काढण्यावरून टोला लगावला. तसेच राजेंद्र पवार यांनी काढलेल्या चिमट्यांवर हात जोडत तुमच्या बोलण्याची नोंद घेतल्याचं म्हटलं. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही हसू आवरले नाही. यानंतर उद्धव ठाकरे यांनी बोलताना यावर भाष्य केलं. तसेच तुम्ही दोघं भाऊ ठरवा आणि काय करायचं ते सांगा, असं म्हटलं. ते बारामतीतील इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “दादा आपण आपल्या बंधूंच्या मनोगताबद्दल बोललात. आता तुम्ही दोघं ठरवा आणि काय काय करायचं, काय काय बाकी आहे हे मला सांगा. त्यांनी काही आडकाठी आणली तर माझ्याकडे या. म्हणजे मी पवार साहेबांकडे जाऊन ती कामं करून घेतो.”

“चांगल्या कामाच्या आड कधीही येणार नाही”

“मी चांगल्या कामाच्या आड कधीही येणार नाही. उगाच काही अडथळे असतील, लालफिती असतील तर त्या कापून टाकू. हा आपला महाराष्ट्र आहे. तो देशात तर सर्वोत्तम असलाच पाहिजे, पण जगात सर्वोत्तम होण्यासाठी जे जे काही करणं गरजेचं आहे ते ते आपण सर्वांनी मिळून केलंच पाहिजे. आपण ते करूच ही जिद्द घेऊन पुढे जाऊ,” असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

अजित पवार म्हणाले, “मी आमच्या बंधुंचं भाषण ऐकत होतो. दिवाळीचा सण आहे आणि आज गाडी इतकी जोरात होती की मला काही कळलंच नाही. समोर मी बसलोय, शरद पवार साहेब बसलेत, सुप्रिया बसलीय पण बाबा थांबायलाच तयार नव्हता. मी म्हटलं अरे बाबा आपल्याला कुणाकडून कामं करून घ्यायची असतील तर पार त्याचं उभं आडवं करून त्याच्याकडून कसं काम होणार?”

हेही वाचा : “आम्ही २५-३० वर्ष उबवणी केंद्र उघडलं होतं, नको ती अंडी उबवली”, बारामतीत उद्धव ठाकरेंची टोलेबाजी!

“बंधुराज जी नोंद घ्यायची ती घेतली”, अजित पवारांनी हात जोडत मोठ्या भावाला सांगितलं

“काम थोडं गोड बोलून, थोडं गोंजरत गोंजरत एखादा चिमटा काढत करून घ्यायचं असतं. पण सारखं इकडे चिमटे तिकडे चिमटे. म्हटलं झालं काय काय आज? पण जाऊ दे आता जास्त बोलत नाही. कारण दिवाळीचा सण आहे. मोठे बंधू पडतात. पण बंधुराज जी काही नोंद घ्यायची ती घेतलेली आहे एवढंच सांगतो. जेवढं करता येणं शक्य असेल तेवढं मुख्यमंत्री नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असतात. ते सर्व आम्ही सर्वजण निश्चित प्रयत्न करू,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

Story img Loader