पुणे : वक्फ बोर्डाच्या विधेयकासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न धुळीस मिळविणारी आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत व्होट बँक तयार करण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे शुक्रवारी केली.
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखडा कार्यक्रमाचा आढाव्यासंदर्भात महसूल अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. ‘वफ्क बोर्ड विधेयकासंदर्भात ठाकरे यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनाही मान्य नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिक पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत, असे लघुसंदेश (एसएमएस) मला राज्यातून येत आहेत. त्यामुळे वर्षभरात ठाकरे यांची शिवसेना संपेल,’ असा दावा बावनकुळे यांनी केला.
भाजप नेते ॲड. आशिष शेलार आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या भेटीसंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात हाडवैर नाही. विकासासंदर्भात विरोधक आणि सत्ताधारी पक्ष एकत्र काम करतात. त्यामुळे शेलार-वडेट्टीवर यांंची भेट राज्याची राजकीय संस्कृती दर्शविणारी आहे. वडेट्टीवार भाजपमध्ये येतील, असे विधान करून कोणाच्या राजकीय आयुष्यावर भाष्य करू नये, असे मला वाटते. शिवसेनेचे (ठाकरे) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारून वेळ वाया घालवू नका,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.