पिंपरी : महागाई, बेरोजगारीसारखे महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून भलत्याच विषयांवर चर्चा घडवून आणली जात आहे. शिवसेनेच्या अंतर्गत वादाला अवास्तव प्रसिद्धी दिली जात असून, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. राजकीय जोडे बाजूला ठेवून सलोख्याच्या भावनेने राहिले पाहिजे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

थेरगाव येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. प्रत्येकाला पक्षाची ताकद वाढवण्याचा तसेच पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, लोकशाहीच्या परंपरा जपल्या पाहिजेत. सद्य:स्थिती पाहता त्यांच्यातील वाद पराकोटीला गेले आहेत. शब्दाने शब्द वाढत जातो. ‘अरे ला कारे’ झाले, की त्याचे पडसाद दूरपर्यंत पसरतात. राजकारणाच्या वेळी राजकारण ठीक आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून सलोख्याच्या भावनेने राहिले पाहिजे.

हेही वाचा : पुणे महापालिकेत सत्तेसाठी शंभरपेक्षा अधिक नगरसेवकांचे भाजपचे लक्ष्य

ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वादात कोणाला कोणते चिन्ह मिळेल, हे आताच सांगता येत नाही. राष्ट्रवादीला प्रारंभी चरखा हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. ऐनवेळी वाद झाला आणि चरखा चिन्ह गोठवण्यात आले. नंतर, आम्हाला घड्याळ मिळाले. प्रसारमाध्यमांमुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे आता कोणतेही चिन्ह असले तरी ते मतदारांपर्यंत पोहोचविणे फारसे अवघड राहिले नाही, असे पवार यांनी सांगितले.

Story img Loader