पुणे : मागील दोन वर्षाच्या कालावधीत भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये अनेक वेळा आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले आहेत. आता थेट ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्वावर हल्ला चढवला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाची उरली सुरली गुर्मीही उतरवू. सगळं सहन करून मी उभारा राहिलो. यापुढे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहिल असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. या विधानानंतर भाजप नेत्याकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा- पुण्यातून बेपत्ता झालेला शाळकरी मुलगा मध्य प्रदेशात सापडला… पोलिसांनी ‘असा’ लावला शोध
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, माझा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास ४० वर्षापासून परिचय आहे. पण अलीकडच्या काळातील उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक भाषणात आगपाखड दिसून येते. तेच तेच मुद्दे लोकांनी कितीवेळा ऐकावे, तुम्हाला एकनाथ शिंदे यांनी दगा दिला की, तुम्ही त्यांच्यावर अन्याय करीत होता. त्यामुळे त्यांनी स्वतःची वाट स्वतः शोधली. तुम्ही त्यांचा हिंदुत्व नावाचा आत्मा दाबता होता. सर्व सामन्य माणसाला माहिती झालं असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांना टोला लगावत पुढे म्हणाले की, ही आगपाखड का चालू आहे?, हा प्रश्न मला मित्र या नात्याने पडला असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.