पुण्यात शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सोमय्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर आवश्यक उपचारही करण्यात आले. यानंतर रविवारी सकाळी सोमय्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी माध्यमांसोबत बोलताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महापालिकेमध्ये गुंड पाठवले होते असा आरोप केला आहे.
पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी पुणे महापालिकेत शनिवारी भाजपा नेते किरीट सोमय्या आले, मात्र पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे झालेल्या गोंधळात त्यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे ते खाली पडले. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले आणि सोमय्या यांना परतावे लागले. गोंधळात खाली पडल्यामुळे सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
“माफियासेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांना अडवण्यासाठी गुंडांना पाठवले होते. महापालिकेत जी गुंडगिरी झाली ती उद्धव ठाकरेंच्या आदेशाने झाली. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना कंत्राट दिले होते. याची चौकशी झाली तर उद्धव ठाकरेंना भारी पडणार आहे. तीन लोकांच्या हत्येचा गुन्हा पाटकर यांच्या कंपनीवर आणि उद्धव ठाकरेंवर दाखल करावा लागेल म्हणून ही गुंडगिरी करण्यात आली,” असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
“उद्धव ठाकरेंना मी सांगतो तुमच्या सारखे माफियासेनेचे अनेक लोक येऊन गेले. गेल्या वर्षाभरात सहावेळा उद्धव ठाकरेंनी गुंडगिरी केली. सगळ्या घोटाळेबाजांना मी तुरुंगात पाठवणार आहे. लवकरच अनिल देशमुखांच्या एका बाजूला संजय राऊत आणि अनिल परब यांना राहायला जावे लागणार आहे,” असे किरीट सोमय्या म्हणाले. मी गुरुवारी दिल्लीत जाणार आहे. पंतप्रधान मोदींकडे आम्ही तक्रार केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनाही या संदर्भात भेटणार आहे, असेही किरीट सोमय्या म्हणाले.
दरम्यान, सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी जम्बो करोना रुग्णालयात घोटाळा झाल्याची तक्रार दिली. तिथून ते महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार होते, याची कुणकुण शिवसैनिकांना लागताच सुमारे १०० शिवसैनिक महापालिका आवारात दाखल झाले. सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना शिवसैनिकांनी त्यांना अडवले, ‘तुम्ही पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाही, निवडक प्रकरणावर का चर्चा करता,’ असा जाब त्यांनी विचारला. त्यावर सोमय्या यांनी ‘मला माहिती द्या, मी त्याबद्दलही प्रशासनाशी बोलतो’, असे सांगितले.
जमलेले शिवसैनिक घोषणाबाजी करत सोमय्यांच्या दिशेने आले. सुरक्षारक्षकांनी घेराव घालून सोमय्या यांना महापालिकेच्या इमारतीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवून धक्काबुक्कीला सुरुवात केली. त्यामुळे परतताना पायऱ्या उतरताना सोमय्या खाली पडले.