महापालिकेच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुण्यात येणार असून पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात त्यांची एकेक सभा आयोजित केली जाणार आहे. पिंपरीतील सभा सोमवारी (१३ फेब्रुवारी) तर पुण्यातील सभा बुधवारी (१५ फेब्रुवारी) होणार असून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, अभिनेता शरद पोंक्षे, शाहीर शिवरत्न शेटे, नितीन बानगुडे-पाटील यांनाही शिवसेनेने प्रचारात उतरविले आहे. त्यांच्याही सभा पुण्यात होणार आहेत.

शिवसेनेच्या प्रचार साहित्याचे प्रकाशन शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आले. या पत्रकार परिषदेत सभांची माहिती शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी दिली. नोटाबंदीचा निर्णय चुकीचा असून सर्वसामान्य नागरिक या निर्णयाने भरडले गेले आहेत. लघुउद्योग, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांवर या निर्णयाचा विपरित परिणाम झाला आहे, असे सांगून ते म्हणाले की महापालिका निवडणुकीसाठी अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन, रिझव्‍‌र्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, तसेच पी. चिदंबरम, उषा रामनाथन, प्रणव सेन, अरुण शौरी, अरविंद सुब्रह्मण्यम, डॉ. सुब्बाराव आदींनी नोटाबंदीवर केलेले विचार संकलित करून त्याची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. पुण्याच्या विकासाबाबत ‘वाचा, विचार करा आणि थंड बसा’ अशा आशयाच्या दोन माहितिपत्रिका तयार करण्यात आल्या असून हे साहित्य घरोघरी पोहोचवले जाणार आहे.

शिवसेनेचा वचननामा भाजपने चोरला

पीएमपीचा मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्ययोजना यांसारखे शिवसेनेच्या वचननाम्यातील अनेक मुद्दे भाजपने जसेच्या तसे चोरले असून महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयार केलेला जाहीरनामा हा शिवसेनेच्या वचननाम्याशी साधम्र्य साधणारा आहे. त्यांनी तो ‘कॉपी’ केला आहे. भाजपकडे योग्य भूमिकेचा अभाव असल्यानेच त्यांनी शिवसेनेचा वचननामा चोरला असा आरोपही निम्हण यांनी केला.

Story img Loader