कोकणात जाऊन शरद पवार स्वपक्षीयांना दम देतात. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार कार्यकर्त्यांना दमदाटी करतात. मात्र, राष्ट्रवादीत त्यांचे कोणी ऐकत नाही. त्यांच्या गावातही त्यांना कोणी विचारत नाही, अशी टीका शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगवी येथे बोलताना केली. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बदलाची लाट आहे. केंद्रात मजबूत सरकार न आल्यास देशात अराजक येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सांगवीतील सभेत ठाकरे बोलत होते. उपनेते शशिकांत सुतार, प्रवक्तया डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार राजकुमार धूत, आमदार बाळा भेगडे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, आम्हाला गळती लागल्याचे पवार म्हणतात. लक्ष्मण जगताप, आझम पानसरे पक्ष सोडून गेले. आमच्याकडील नाराजांना उमेदवारी देऊन त्याचे काम करा म्हणून टग्याने पदाधिकाऱ्यांची खडसावले. तसाच दम द्यायला शरद पवार कोकणात गेले. नारायण राणे यांच्याविषयी तीव्र असंतोष असताना दीपक केसरकरांना सक्तीने काम करायला सांगितले. त्यांनी उलट राजीनामा दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये छोटे पवार तर तिकडे मोठे पवार दम देतात. मात्र त्यांचे कोणी ऐकले नाही. पूर्वी पवारांचे प्रस्थ होते. लोक बिचकायची, आता ‘कोण पवार?’ म्हणून विचारतात. अजित पवारचेही तेच आहे, या टग्याचा फुगा फोडला पाहिजे. उस्मानाबादमध्ये खुनाचा गुन्हा असलेल्या पद्मसिंह पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. अशी प्रवृत्ती लक्ष्मण जगताप यांच्या रूपाने मावळमध्ये आहे. या प्रवृत्तीच्या उमेदवारांना निवडून देऊ नका. गाफील राहू नका. मग, किती बोगस मतदान झाले, तरी जगतापांची अनामत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
खासदार गजानन बाबर यांनी तिकीट विकल्याचा आरोप केल्याबद्दल ते म्हणाले, की एक उमेदवारी जरी पैसे घेऊन दिल्याचे सिद्ध झाल्यास शिवसेनेचे अध्यक्षपद सोडून घरी बसेन.
‘लवासा’ अधिकृत करता,
गरिबांची घरे का पाडता?
अनधिकृत बांधकामाच्या विषयावर उद्धव ठाकरे म्हणाले, स्वत:ची घरे सोनेरी कौलांची करायची आणि दुसऱ्याची घरे अनधिकृत म्हणून पाडायची, हे चालणार नाही. घरे पाडल्यास गाठ शिवसेनेशी आहे. तुमचे ‘लवासा’ अधिकृत करता. मग, गोरगरिबांची घरे का पाडता. केंद्रात व राज्यात तुमची सत्ता असताना ती घरे सोडवून घेण्याचे का सुचले नाही. या घरांना लवासाचे नाव दिल्यास ती कोणी पाडायला येणार नाही, अशी खिल्ली त्यांनी उडवली.