उद्धव ठाकरे लाचार आहेत, शिवसेनेने वाघाचा फोटो काढून उंदराचा लावला पाहिजे, भाजपवाले शिवसेनेला तुकडे टाकतात आणि ते कुत्र्या-मांजरासारखे वागतात. वेगळा विदर्भ, नंतर मुंबई असे करत महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा भाजपचा डाव आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद ठेवून सत्तेसाठी प्रयत्न करणारी  शिवसेना दुट्टपीपणा करत आहे, अशी भाजप-शिवसेनेला झोडपून काढणारी टीका काँग्रेसचे आमदार नीतेश नारायण राणे यांनी चिंचवड येथे बोलताना केली.
‘स्वाभिमानी’ संघटनेच्या पिंपरी शाखेच्या उद्घाटनासाठी राणे पिंपरी-चिंचवडला आले, तेव्हा पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे म्हणाले, उद्धव ठाकरे लाचार आहेत. बाळासाहेबांमधील कोणते गुण त्यांनी घेतले हा संशोधनाचा विषय आहे. सामान्य शिवसैनिक अस्वस्थ आहे. शिवसेनेने वाघाचा काढून तेथे उंदराचा फोटो लावावा. भाजप शिवसेनेला बिस्कीट टाकते आणि हे कुत्र्या-मांजरासारखे वागतात. जे काही आहे ते शिवसेनेने ठणकावून सांगितले पाहिजे. मात्र, भाजपपुढे शिवसेना आवाज करू शकत नाही. ते मराठी माणसाला काय न्याय देणार. ‘मातोश्री’ला खरी चिंता ‘इनकिमग’ची आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे. एकीकडे सत्तेसाठी लाचार व्हायचे आणि दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपद स्वत: ठेवायचे, हा दुतोंडीपणा आहे. विरोधी पक्षनेता प्रभावी हवा. शिवसेना काहीही करू शकत नाही. काँग्रेसकडे हे पद आल्यास सक्षमपणे विरोध करू. कोणत्याही परिस्थितीत वेगळा विदर्भ नको, आम्ही महाराष्ट्र तुटू देणार नाही. भाजपला सत्ता मिळाली, आता त्यांनी विदर्भाचा विकास करावा, वेगळा विदर्भ कशासाठी, तसा प्रयत्न झाल्यास एकेकाची गाढवावरून धिंड काढू. महाराष्ट्र तोडण्यासाठी जनतेने भाजपला मतदान केलेले नाही. सत्तेत आल्यानंतर भाजपवाले मूळ प्रश्न विसरले व खरा चेहरा जनतेसमोर आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मिळवली आता त्यांचेच राज्य तोडायला निघाले आहेत, ते आम्ही होऊ देणार नाही.

Story img Loader