२०२४ मध्येही उद्धव ठाकरेचं राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुण्यात सभा घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, की पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडवकवण्याची वेळ आली आहे. बाळासाहेबांचं पुण्यावर खूप प्रेम होतं. मुंबईनंतर सर्वाधिक जास्त काळ त्यांनी पुण्यात घालवला. त्यामुळे पुणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता यायला पाहिजे. तसेच ठाकरे सरकारला आव्हान देणाऱ्यांसाठी ठोक-रे सरकार, या सरकारचं कुणीही वाकडं करू शकणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्या पुण्याची जमीन छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर लावून नांगरली, त्या पुण्यात शिवसेनेला संधी कधी मिळणार, असंही त्यांनी उपस्थितांना विचारलं. तसेच कोणीही शिवसेनेला खाली खेचू शकत नाही. कोणतीही आघाडी, युती झाली तरी शिवसेना ही शिवसेना आहे. आघाडीत भांड्याला भांड लागणारच. ते आपल्याला नको असेल तर आपण एका पक्षाला सत्तेत आणायला पाहिजे. जोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत आहे ते गोड मानून घ्यावं लागणार, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, पहाटेचा कार्यक्रम आता विसरला पाहिजे, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटे झालेल्या शपथविधीचा उल्लेख केला. तसेच अजित पवारांविषयी आम्हाला आदर आहे. उद्धव ठाकरे अजित पवारांचेही नेते आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच तुम्ही पुण्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका. कारण शिवसैनिक तापला की माझी सटकली म्हणून तो रस्त्यावर उतरतो, त्यामुळे त्याची काळजी घ्या,” असं आवाहन संजय राऊत यांनी अजित पवारांना केलं.

शिवसेना-जातपात न माणनारा पक्ष आहे. तसेच हा महाराष्ट्र आणि हा देश एकच आहे. या भावनेतून बाळासाहेबांनी राजकारण केलं. त्यांचा तोच वारसा आम्ही पुढं नेतोय. पक्ष महत्वाचा आहे, पद नाही, असंही ते म्हणाले. मंत्रीपदं येतात आणि जातात, मग लोकं मला माजी म्हणू नका, असं म्हणतात, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. तसेच शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, शिवसेना ही आग आहे. शिवसेना हा लंबी रेसचा घोडा आहे, असंही राऊत म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray will be the chief minister of maharashtra in 2024 says sanjay raut hrc