पंढरीला निघालेल्या वारीची हेलिकॉप्टरमधून छायाचित्रे काढण्याचा अनुभव घेतलेल्या शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यंदा पालखीत सहभागी होण्याची इच्छा पूर्ण केली. आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सोमवारी सकाळी ते सहभागी झाले. नियमितपणे वारीला जाणाऱ्या माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याशी त्यांनी फुगडीही खेळली.
माउलींच्या पालखीने आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान ठेवल्यानंतर चऱ्होलीच्या ताजणे मळा ते साई मंदिरासमोरील पादुका मंदिरापर्यंत ठाकरे यांनी पायी वारी केली. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर, संपर्कप्रमुख गजानन कीर्तीकर, आमदार विजय शिवतारे, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ, उमेश चांदगुडे, सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे, शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, नगरसेवक सुलभा उबाळे, प्रशांत बधे आदी पदाधिकारी या वेळी त्यांच्यासमवेत होते. या वेळी पोलिसांची तारांबळ उडाल्याचे दिसून येत होते. उद्धव ठाकरे यांनी पादुका मंदिराची पाहणी केली. तेथे आरती केली. वारकऱ्यांचे आशीर्वाद घेतले. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या पाचपुते यांच्यासमवेत ते फुगडी खेळले व नंतर ते मुंबईकडे रवाना झाले. ‘पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची खूप इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. भारलेले वातावरण, अवर्णनीय आनंद आणि तल्लीन वारकरी असा सोहळा व भक्तीचा अलोट जनसागर जगात कुठेही नसेल,’ अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

Story img Loader