उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व कमकुवत आहे, म्हणूनच दररोज एकेक नेता पक्षातून बाहेर पडतो आहे. उद्धव आणि पक्षसंघटना यांचा एकमेकांशी संबंधच येत नाही. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर चुकीच्या पद्धतीने टीका करणाऱ्या उद्धव यांनी, ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या ‘गुंडा’ प्रमाणे आहेत का, याचे उत्तर शिवसैनिकांना द्यावे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी थेरगाव येथे केली.
थेरगाव येथील बाळकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री मदन बाफना, आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, महापौर मोहिनी लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल आदी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भाषणात एक संदर्भ नेहमी द्यायचे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याच्या हाती शिवसेनेचा झेंडा. ग्रामीण भागातील राजकीय परिस्थितीचा संदर्भ देताना अजितदादांनी कधीकाळी उच्चारलेल्या ‘टगेगिरी’ शब्दाचे उद्धव ठाकरे भांडवल करतात. वयाचा मान न राखता शरद पवार यांच्यावर चुकीच्या पद्धतीने टीका करतात. त्यांनी आता शिवसैनिकांना उत्तर द्यावे की, ते बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले ‘गुंड’ आहेत का? मात्र, ते उत्तर देऊच शकत नाहीत आणि ते आपल्या नादी लागत नाहीत. शिवसेनेची सध्या काय अवस्था आहे. दररोज एकेक जण बाहेर पडत आहे. ‘तोंडात बडबड, बाकी सीताफळ’ असे उद्धव ठाकरे बुळबुळीत भाजीसारखे आहेत. राहुल नार्वेकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली हे त्यांना माहिती नव्हते, अशी कशी संघटना ते चालवतात. पक्षसंघटना आणि उद्धव ठाकरे म्हणजे ‘दोन डोळे शेजारी आणि भेट नाही संसारी’, असा त्यांचा कारभार आहे. सहा-सहा महिने ते बाहेरही येत नाहीत. पूर्वीचे शिवसैनिक जहाल होते, काहीतरी करण्याची धमक त्यांच्यात होती. कारण, ते बाळासाहेबांचे शिवसैनिक होते. आताचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचे असून ते त्यांच्या तब्येतीसारखेच आहेत. राजू शेट्टी यांनी उद्धव यांना आसूड आणून दिला, तेव्हा तो त्यांना झेपत नव्हता. शिवबंध धागा तुटणार नाही, असे उद्धव म्हणाले. मात्र, आनंद परांजपे यांच्यापासून ते भाऊसाहेब वाघचौरे, गजानन बाबर अशा अनेकांनी तो धागा तोडून टाकला. बाळासाहेबांनंतर शिवसेनेत परिस्थिती बदलली. मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला दसऱ्याच्या दिवशी हाकलून देण्यात आले. परांजपे यांनाही अपमानित करण्यात आले. गणेश दुधगावकर अजितदादांना भेटले, त्यांनीही अशीच व्यथा मांडली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
महाराष्ट्रात ‘आप’ चा सुपडा साफ
माध्यमांमध्ये दररोज दाखवल्या जाणाऱ्या ‘मोदी लाईव्ह’ चे प्रमाण कमी झाले असून मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख खाली येऊ लागल्याने मोदींच्या सभांचे प्रक्षेपणही कमी झाले आहे, असे भास्कर जाधव म्हणाले. अरविंद केजरीवाल यांचा आप पुरता साफ झाला असून त्यांच्यात दम नाही. महाराष्ट्रात त्यांच्या एकाही उमेदवाराची अनामत रक्कम वाचणार नाही, असे ते म्हणाले.

Story img Loader