‘‘सध्या देशाची आर्थिक परिस्थिती वाईट दिसत असली तरी देशातील युवाशक्तीचा पुरेपूर उपयोग करून घेतल्यास येत्या १० ते १५ वर्षांत देश महासत्ता होणे शक्य आहे,’’ असे मत केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.
‘शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्ट’तर्फे डॉ. जाधव यांच्या हस्ते केशरचंद बोरा आणि हणमंत गायकवाड यांना ‘उद्यम गौरव पुरस्कार’ तर, ‘नारायण देशपांडे आणि नीलेश निमकर’ यांना ‘सेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. पंधरा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मोहन गुजराथी, जयंत गुजराथी, सुभाषचंद्र देवी, कन्हैयालाल गुजराथी, नलिनी गुजराथी, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’चे महासंचालक अनंत सरदेशमुख या वेळी उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाले, ‘‘बाराव्या पंचवार्षिक योजनेत विकासाचे नेमके उद्दिष्ट ठरवण्यात आलेले नाही. परंतु राजकीय परिणामांचा विचार न करता व राजकीय इच्छाशक्तीच्या साहाय्याने आवश्यक त्या सर्व आर्थिक सुधारणा देशाने केल्यास ८.२ टक्के विकास दर साधता येईल. देशाचे सध्याचे सरासरी वय चोवीस वर्षे आहे. २०२० साली ते सरासरी २९ वर्षे असेल. अमेरिका, चीन, पश्चिम युरोप, जपान हे प्रगत देश वृद्धत्वाकडे झुकताना भारताला मात्र युवाशक्तीचे वरदान मिळाले आहे. येत्या पंधरा वर्षांत एकूण लोकसंख्येतील काम करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण वाढणार आहे. तरूणाईचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे व कौशल्य विकसनावर भर देणे आवश्यक आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेत या दोन गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. आजवर देशाने शिक्षणावर आवश्यक खर्च केलेला नाही. २००७ सालापर्यंत देशाच्या एकूण उत्पन्नाच्या ३.५ टक्केच शिक्षणावर खर्च होत होता. आपले शिक्षण व्यवसायाभिमुखही नाही. देशातील १८ ते २३ वयोगटातील केवळ बारा टक्के विद्यार्थ्यांना कौशल्य विकसनाची औपचारिक किंवा अनौपचारिक संधी मिळते. या हिशेबाने आगामी काळात आपल्याला तब्बल पन्नास कोटी लोकसंख्येस प्रशिक्षित करायचे आहे. कोणत्याही देशाच्या आयुष्यात अशी संधी एकदाच येते! या संधीचा फायदा देशाने वेळीच करून घेतला नाही तर आपल्यासारखे कपाळकरंटे आपणच!’’
तर देश महासत्ता होणे शक्य..- डॉ. नरेंद्र जाधव
‘शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्ट’तर्फे डॉ. जाधव यांच्या हस्ते बोरा आणि गायकवाड यांना ‘उद्यम गौरव पुरस्कार’ तर, ‘नारायण देशपांडे आणि नीलेश निमकर’ यांना ‘सेवा गौरव पुरस्कार’ प्रदान.
First published on: 09-07-2013 at 02:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udyam gaurav and seva gaurav rewards distributed by dr jadhav