सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) घेण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला तीन वर्षांसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता सेट परीक्षेच्या कालावधीत कोणताही खंड पडणार नाही. मार्चमध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी आतापर्यंत १ लाख १० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
हेही वाचा >>> पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात गृह खात्याच्या निवृत्त उपसचिवांची साक्ष
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात येते. विद्यापीठाच्या नियोजनानुसार सेट परीक्षा २६ मार्चला होणार आहे. यंदा परीक्षेसाठी परभणी आणि रत्नागिरी ही दोन केंद्रे वाढवण्यात आली आहेत. त्यामुळे परीक्षेची एकूण केंद्रे सतरा झाली आहेत. मार्चमधील परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या, मात्र ही परीक्षा घेण्यासाठी यूजीसीकडून वेळेत परवानगी मिळाली नाही. अखेर यूजीसीची मान्यता मिळाल्यानंतर आता दीड वर्षांनी परीक्षा होत आहे. यूजीसीने तीन वर्षांसाठी सेट परीक्षा घेण्यास अनुमती दिली आहे. वर्षांतून दोनदा सेट परीक्षा घेता येऊ शकते. मात्र, तूर्तास वर्षांतून एकदाच परीक्षा घेण्याचे नियोजन असल्याचे सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी सांगितले. सेटसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना ८ ते १० डिसेंबर या कालावधीतच आपल्या लॉगीनद्वारे अर्जात दुरुस्ती करता येईल. त्यानंतर अर्जात बदल करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.