विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) १९ अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन किंवा दूरस्थ पद्धतीने प्रवेशास मनाई केली आहे. तसेच ऑनलाइन आणि दूरस्थ अभ्यासक्रमांच्या मान्यतेची खात्री करूनच पुढील प्रक्रिया करण्याबाबत स्पष्ट केले आहे. यूजीसीकडून देशभरातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाइन माध्यमासह मुक्त व दूरस्थ पद्धतीने विविध अभ्यासक्रमांना परवानगी दिली जाते. पण अनेक संस्था मान्यतेविनाच अभ्यासक्रम राबवत असल्याचे समोर आले आहे. अभ्यासक्रमांच्या मान्यतेची खात्री न केल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक प्रवेश घेण्याच्या स्पष्ट सूचना यूजीसीने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
हेही वाचा >>> आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री प्रकरण : मुख्य दलालाला मुंबईतील माहिममधून अटक
यूजीसीने दिलेल्या सूचनांनुसार, उच्च शिक्षण संस्थांना दूरस्थ अभ्यासक्रम, ऑनलाइन अभ्यासक्रमांची मान्यता विद्यार्थ्यांनी तपासावी. यूजीसीसह संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर त्याची माहिती पाहावी. याबाबतची माहिती http://deb.ugc.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांची माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपूर्वीच दूरस्थ आणि ऑनलाइन अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश यूजीसीने दिले आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि इतर पॅरामेडिकल अभ्यासक्रम, औषध निर्माणशास्त्र, नर्सिंग, दंतवैद्यक, वास्तुकला, विधी, कृषी, उद्यानविद्या, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, कलिनरी सायन्स, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, व्हिज्युअल आर्ट्स अँड स्पोर्ट्स, ॲव्हिएशन. योगा ॲण्ड टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांशिवाय पीएचडी व एमफिल हे अभ्यासक्रमही ऑनलाइन किंवा दूरस्थ पद्धतीने करण्यास बंदी असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.