पुणे : देशात एम.फिल. (मास्टर्स ऑफ फिलॉसॉफी) पदवीला मान्यता नसल्याचे सांगत विद्यापीठांनी या अभ्यासक्रमाचे प्रवेश थांबवण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र, क्लिनिकल सायकोलॉजी आणि सायकॅट्रिक सोशल वर्क या अभ्यासक्रमांना प्रवेशबंदीतून तात्पुरती सूट देण्यात आली असून, या दोन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देता येणार आहे.
युजीसीने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. काही विद्यापीठे एम.फिल. अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबवत असल्याचे निदर्शनास आल्याने युजीसीकडून तातडीने प्रवेश थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. युजीसी (किमान मानके आणि पीएच.डी. देण्यासाठीची प्रक्रिया) अधिनियम २०२२ तील नियम १४ मध्ये उच्च शिक्षण संस्थांनी एम.फिल. अभ्यासक्रम न राबवण्याबाबत स्पष्टपणे नमूद केलेले आहे. युजीसी अधिनियम २०२२ बाबतचे राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी एम. फिल. अभ्यासक्रमाची प्रवेश तातडीने थांबवावी, असे युजीसीने डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले होते.
हेही वाचा…प्रवेशाची पायरी:पदवीनंतर एमबीए, एमसीए, लॉ सीईटी
या पार्श्वभूमीवर क्लिनिकल सायकोलॉजी आणि सायकॅट्रिक सोशल वर्क या क्षेत्रातील कर्मचारी मानसिक आरोग्य सेवा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या विषयांना सूट देऊन क्लिनिकल सायकोलॉजी आणि सायकॅट्रिक सोशल वर्क या विषयांतील एम.फिल. पदवीची वैधता २०२५-२६पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने क्लिनिकल सायकोलॉजी आणि सायकॅट्रिक सोशल वर्क या विषयांत एम.फिल.साठी विद्यापीठे प्रवेश देऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.