पुणे : शैक्षणिक वर्ष २०२४-२५संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार बिगरव्यावसायिक पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे वर्ग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, तर द्वितीय वर्षाचे वर्ग जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू करावे लागणार आहेत. तसेच सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर करावे लागणार आहेत.
युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांचे शैक्षणिक वर्ष विस्कळित झाले होते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये ते बऱ्याच प्रमाणात पूर्वपदावर आले आहे. या पार्श्वभूमीवर युजीसीकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू करण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाचे वर्ग सुरू करण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्ष आणि त्या पुढील विद्यार्थ्यांना प्रकल्प, कार्यप्रशिक्षण (इंटर्नशीप) वगैरे लक्षात घेता दोन आठवड्यांची सवलत देता येऊ शकते.
हेही वाचा :आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
उच्च शिक्षण संस्थांच्या शैक्षणिक वेळापत्रकात शैक्षणिक वर्षातील वर्ग सुरू होणे, परीक्षा, सुट्या, शैक्षणिक सत्राचा शेवटचा दिवस अशी माहिती दिली असते. शैक्षणिक वेळापत्रकामुळे संबंधित सर्व भागधारकांना वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन करणे शक्य होते. त्यामुळे सुनियोजित वेळापत्रक जाहीर केल्याने शैक्षणिक उपक्रम नियोजनानुसार पूर्ण करणे शक्य होते. तसेच अध्ययन, अध्यापन, संशोधनामध्ये गुणवत्तेचा प्रचार होण्यास मदत होते. त्या अनुषंगाने युजीसी (औपचारिक शिक्षणाद्वारे प्रथम पदवी मान्य करण्यासाठी किमान मानक सूचना) २०३३मध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यापीठांनी त्यांचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक आहे. त्यात वर्षभरात होणाऱ्या सर्व उपक्रमांचा समावेश असणे आवश्यक आहे. तसेच पदवी प्रदानासंदर्भातील तारखांचाही त्यात समावेश असला पाहिजे. त्यामुळे युजीसी किंवा संबंधित नियामक परिषदेच्या नियमांनुसार उच्च शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष सुरू करणे, परीक्षेचे वेळापत्रक, निकाल जाहीर करणे या बाबतच्या नियोजनाचे पालन करावे, शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.