परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी भारतीय संस्कृती आणि वारसा या विषयावरील अभ्यासक्रम उपलब्ध करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठांना दिले. परिचय, प्राथमिक आणि प्रगत स्तरावरील या कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी श्रेयांक देण्याची सूचनाही करण्यात आली.

यूजीसीने परदेशी विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मधील तरतुदींनुसार मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. अलीकडेच उच्च शिक्षणात भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही यूजीसीने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानंतर आता परदेशी विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रमांची निर्मिती करावी. अभ्यासक्रमातून मिळवलेल्या श्रेयांकांचा उपयोग श्रेयांक हस्तांतरणासाठी केला जाईल. तसेच हे श्रेयांक ॲकॅडमिक क्रेडिट बँकेत हे श्रेयांक साठवले जातील. आवश्यक श्रेयांक, आवश्यक शैक्षणिक घटक आणि अपेक्षित अध्ययन निष्पत्ती संस्थांच्या पातळीवर निश्चित करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणे : बाणेरमध्ये परदेशी नागरिकाकडून साडेचार लाख रुपयांचे कोकेन जप्त

भारतीय वारसा आणि ज्ञान क्षेत्रांमध्ये रस असलेल्या विविध देशातील विद्यार्थी ज्ञान मिळवण्यासाठी संबंधित क्षेत्रांतील अभ्यासक्रमांनाप्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमांसाठीची पात्रता विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था त्यांच्यास्तरावर निश्चित करू शकतात. मार्गदर्शक सूचनांनुसार एकूण ४६ क्षेत्रांतील अभ्यासक्रम तयार करता येणार आहेत. त्यात आयुर्वेद, भारतीय भाषा, भारतातील पुरातत्त्वीय स्थळे, सांस्कृतिक वारसा, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संगीत आणि नृत्य प्रकार, भारतीय खाद्यसंस्कृती, भारतीय पुराण, भारतातील नद्या आदींचा समावेश आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक अभ्यासक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन मिळून साठ तासांचा असेल. प्रगत स्तरावरील अभ्यासक्रमाच्या आवश्यकतेनुसार आचार्य, कलाकार, सत्संग, लोककलांचा परिचय, अभ्यासक्रमाशी संबंधित प्रसिद्ध ठिकाणांच्या भेटींचा समावेश करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.

Story img Loader