पुणे : देशभरातील विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, महाविद्यालयांना प्राध्यापक भरती करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०१९ ते २०२१ या कालावधीत पाच वेळा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता नव्याने निर्देश देण्यात आले असून, प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबतची माहिती ३१ जुलैपर्यंत पाठवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी याबाबतचे परिपत्रक दिले. विद्यापीठे, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांतील प्राध्यापकांच्या जागा रिक्त राहिल्याने त्याचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होतो. शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक टंचाई हा चिंताजनक विषय असल्याचे नमूद करून ‘यूजीसी’ने हस्तक्षेप करून प्राध्यापक भरती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही भरतीप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्राध्यापक भरती करण्याचे स्मरण यूजीसीने करून दिले आहे. तसेच त्याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
हेही वाचा…अमेरिकेनंतर जपानमध्येही आता ‘मराठी’चे धडे… होणार काय?
राज्यातही विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. अलीकडेच राज्य शासनाने मान्यता दिलेल्या २०८८ पदांवर प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्याशिवाय विद्यापीठांतील रिक्त जागा भरण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.