पुणे : उच्च शिक्षणातील पदवीपूर्व स्तरावरील कला, समाजशास्त्र आणि विज्ञान विद्याशाखांसाठी बारा भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके लिहिण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) लेखकांच्या शोधात आहे. त्यानुसार लेखक, शिक्षकांकडून पाठ्यपुस्तके लिहिण्यासाठी अर्ज मागवण्यात आले असून, त्यासाठी ३० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता उच्च शिक्षणातील पदवीपूर्व स्तरावर बारा भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे आता उच्च शिक्षणातील अभ्यासक्रम विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करणे, त्यासाठी विविध भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी बारा भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार करण्यासंदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि ऊर्दू या भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार करण्याचे नियोजन आहे.
हेही वाचा >>>माझ्या प्रचाराला अजितदादाच येणार, शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे विधान
परिपत्रकातील माहितीनुसार पदवीपूर्व स्तरावरील कला, विज्ञान आणि समाजशास्त्रातील विविध अभ्यासक्रमांसाठी बारा भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके लिहिण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी इच्छुक असलेले लेखक, उच्च शिक्षण संस्थांतील शिक्षक त्यांचे अर्ज ३० जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येतील, असे नमूद करण्यात आले आहे.