पुणे : जी २० परिषदेच्या जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या निर्देशानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नवा फतवा काढला आहे. पदवी प्रदान, क्रीडा स्पर्धा, वार्षिक संमेलन आदी नियमित कार्यक्रमांतही जी-२० परिषदेचे ब्रँडिंग करण्याचा आदेश यूजीसीने देशातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना दिला आहे. तसेच प्रत्येक कार्यक्रमात जी-२० परिषदेचे बोधचिन्ह असलेले फलक लावणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या संदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. जी-२० परिषदेच्या दोनशे बैठका देशभरातील ५६ शहरांमध्ये होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जी-२० परिषद प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘युनिव्हर्सिटी कनेक्ट’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात जी-२०च्या विषयाशी संबंधित मॅरेथॉन, सायकल मॅरेथॉन, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा, इन्स्टा रील आदी स्पर्धा शिक्षण संस्था, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जातील. स्वच्छता अभियान राबवण्यात यावे. त्यातील स्वयंसेवकांना जी-२०चे बोधचिन्ह असलेले टी शर्ट, टोपी, रिस्ट बँड द्यावेत. रीसोर्स अँड इन्फर्मेशन सेंटर फॉर डेव्हलिपग कंट्रीजतर्फे (आरआयसीडीसी) ७५ विद्यापीठांमध्ये चर्चासत्र आयोजित केले जाणार असल्याचे नमूद केले.
सूचना काय?
यूजीसीच्या परिपत्रकानुसार विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांचे पदवीप्रदान कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, वार्षिक संमेलन आदी कार्यक्रमांत जी-२० परिषदेचे ब्रँडिंग करावे. प्रत्येक कार्यक्रमात जी-२० परिषदेचे बोधचिन्ह असलेले फलक लावणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यूजीसीकडून जी-२०चे बोधचिन्ह, फलकाचे डिझाइनही उपलब्ध करून देण्यात आले आहे.