उजनी धरणात पस्तीस वर्षांपूर्वी पाणी अडवण्यास सुरुवात केल्यानंतरची सर्वात नीचांकी पातळी या धरणाने गेल्या शनिवारी (८ जून) गाठली. या धरणाचा मृत साठाही निम्म्यावर आला असून, त्यात आता केवळ ३० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, पावसाळा सुरू होऊन आठवडा होत आला तरी उजनीच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.
उजनीच्या पाण्याची पातळी कमालीची घटल्याने पाणलोट क्षेत्रात ३५ वर्षांपूर्वी जलमय झालेली अनेक गावे, मंदिरे, उघडी पडली असून, अनेक ठिकाणी भीमा नदीचे मूळ नदीपात्र दिसत आहे. घटलेल्या पाणीपातळीचा फटका पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी उचलून घेऊन ओलिताखाली आलेल्या भागाला बसला आहे. दूरवरून पाणी आणण्यासाठी पाईप, विद्युतवाहिन्या व अनेक ठिकाणी चाऱ्या काढून शेतकऱ्यांनी पाणी आणण्याचा प्रयत्न केला. धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा विचार न करता नदीपात्रातून उजनीचे पाणी सोडल्याचा आरोप धरणग्रस्त कृती समितीचे अंकुशराव पाडुळे यांनी केला.
उजनी धरणाचा मूळ सिंचन आराखडा व सिंचनामध्ये झालेल्या वेळोवेळीच्या बदलाची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाने प्रसिद्ध करावी. उजनी धरणग्रस्तांच्या पाण्याचा आराखडय़ात समावेश करून त्यांच्या वाटय़ाचे पाणी धरणात राखून ठेवावे, अशा अनेक मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
उजनीच्या पाण्याचा औद्योगिक, शेतीपूरक व्यवसाय व साखर उद्योगांनाही मोठय़ा प्रमाणात वापर वाढला आहे. उपयुक्त पाण्याची साठवण क्षमता ५७ टीएमसी एवढी, तर मृत साठय़ात ६० टीएमसी पाणी राहते. एकूण ११७ टीएमसी पाणी उजनीत साठते. उजनी धरणाला स्वत:चे पाणलोटक्षेत्र कमी असल्याने पुणे जिल्ह्य़ातील सर्व धरणे भरल्याशिवाय उजनीत पाणी येत नाही. मोठय़ा प्रमाणात पाणी साठवण क्षमता असतानाही नियोजनबाह्य़ पाणी वापरामुळे उजनीने ही पातळी गाठली, असा आरोप धरणग्रस्तांचा असून या वर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास मोठय़ा पावसाची प्रतीक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा