युनायटेड किंग्डमच्या (यूके) वारीसाठी लागणारा व्हिसा आता सहजतेने मिळू शकणार आहे. इतकेच नव्हे तर व्हिसा प्रक्रियेत अर्जदाराचे पारपत्र तपासून त्याच दिवशी परत करण्याची सुविधा लवकरच मुंबईसह पुण्यातही उपलब्ध होऊ शकेल. ब्रिटिश उपउच्चायुक्त कुमार अय्यर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  
यूकेच्या व्हिसा प्रक्रियेसंबंधी तसेच विद्यार्थी व्हिसाविषयी विनाकारण गैरसमज असल्याचे अय्यर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘फास्ट ट्रॅक’ प्रक्रियेत यूकेचा व्हिसा केवळ ३ दिवसांत तर ‘प्रीमियम’ सेवेअंतर्गत हा व्हिसा अर्ज केल्याच्या दिवशीच हातात पडू शकतो. मुंबईच्या व्हिसा अप्लिकेशन केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर ‘पासपोर्ट पासबॅक’ यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. यात व्हिसा अप्लिकेशन केंद्रात अर्जदाराने कागदपत्रे जमा केल्यानंतर त्याचे पारपत्र त्याच ठिकाणी तपासले जाऊन त्याला लगेच परत देण्याची व्यवस्था केली जाते. व्हिसासाठी पारपत्र अडकून न पडल्यामुळे यूकेला येण्यापूर्वी इतर देशांत थांबू इच्छिणाऱ्यांची गैरसोय टाळली जाते. ही यंत्रणा यशस्वी ठरल्यास ती पुण्याच्या व्हिसा अप्लिकेशन केंद्रातही सुरू करण्यात येईल.’’
यूकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या १० विद्यार्थ्यांपैकी सर्वसाधारणपणे ९ जणांना व्हिसा मिळतो, तर बिझिनेस व्हिसासाठीच्या अर्जदारांपैकी ९६ टक्के अर्जदारांना व्हिसा मिळतो, असेही अय्यर यांनी सांगितले. ‘‘विद्यार्थ्यांच्या व्हिसासाठी कोणतीही कोटा पद्धत अवलंबली जात नाही. तसेच ‘व्हिसा बाँड’ अशा प्रकारचे कोणतेही धोरण यूके सरकार राबवत नाही. यूकेमधील अधिकृत विद्यापीठांमधील प्रवेशासाठी अर्ज केलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांला व्हिसा मिळू शकतो. पदवीचे शिक्षण यूकेमध्ये पूर्ण केल्यानंतर पूर्वी ३ वर्षे तिथे काम करता येत असे. ही मर्यादा आता वाढवून ६ वर्षे करण्यात आली आहे,’’ असेही ते म्हणाले.
यूकेमधील उद्योगधंदे व व्यापार याविषयी अय्यर म्हणाले, ‘‘यूके केवळ वित्तपुरवठय़ातच सक्रिय आहे असे चित्र उभे केले जाते. मात्र वाहनउद्योग, विमानउद्योग, औषधनिर्मिती या क्षेत्रातही आम्ही आघाडीवर आहोत. आमच्याकडे केवळ चोवीस तासांत कंपनी नोंदणीकृत करून घेता येते. भारताबरोबर यूकेचा असलेला व्यापार २०१५ पर्यंत दुप्पट करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, औषधनिर्मिती, रीटेल आणि वित्तपुरवठा ही क्षेत्रे द्विपक्षीय व्यापारासाठी महत्त्वाची आहेत.’’
मुंबई-बंगळुरू औद्योगिक पट्टा प्रकल्पाविषयीच्या शक्यता तपासण्यासाठी एका कंपनीकडून ‘फिजिबिलिटी स्टडी’ करून घेणार असून या अभ्यासाचा अहवाल येण्यास अजून एक वर्षांचा कालावधी लागू शकतो, असेही अय्यर यांनी सांगितले.       
पुण्यातील अभियंत्यांच्या कौशल्य विकसनासाठी यूकेचा पुढाकार
यूकेच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स’ या संस्थेची ‘ऑटोमोटिव्ह’ शाखा पुण्यात सुरू होणार आहे, अशी माहिती अय्यर यांनी दिली. ‘अभियंत्यांसाठी या शाखेचे सदस्यत्व खुले करण्यात येईल. ही अभियांत्रिकीचे व्यावसायिक शिक्षण देणारी शाखा असणार आहे. ‘ऑन जॉब’ कौशल्य विकसनावर ती भर देईल,’ असे ते म्हणाले.