रामोशी आणि इतर भटक्या विमुक्त जातीच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल. त्यासाठी १०० कोटी रुपयांची आणि राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. शिवरायांनंतर स्वराज्याची ज्योत पेटवण्याचे कार्य आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी केले. त्यांना दैवत मानणारे आपले सरकार आहे. रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवडी (ता.पुरंदर) येथे सांगितले.आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मगावी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित शासकीय जयंती सोहळ्यात कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा >>> पुणे : धरणातून पाणी सोडणार नसल्याने कृत्रिम हौदांमध्येच श्रींचे विसर्जन
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, जयकुमार गोरे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख ,विजय शिवतारे ,बाळा भेगडे, योगेश टिळेकर, जालिंदर कामठे, बाबाराजे जाधवराव, गणेश भेगडे, राजे उमाजी नाईकांचे वंशज चंद्रकांत खोमणे, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे, रामदास धनवटे आदी त्या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> पुणे : विसर्जन मिरवणुकीसाठी साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त ; विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
फडणवीस म्हणाले, की रामोशी आणि इतर भटक्या व विमुक्त जातींमधील नागरिकांना यापुढे जातीच्या दाखल्यासाठी अडचणी येणार नाहीत, यासाठी जातीच्या दाखल्यासंदर्भातील प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. काही मागण्या राज्याच्या व केंद्राच्या अखत्यारीत आहेत. सर्व मागण्यांच्या निर्णयासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असून, समाजाच्या सर्व समस्या निकाली काढल्या जातील. तुम्ही सर्वांनी मिळून भाजप व शिवसेनेला निवडून दिले .दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. राजे उमाजी नाईक यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता म्हणून भगवा झेंडा घेऊन एकनाथ शिंदे आमच्या सोबत आले. आता मुख्यमंत्री आणि मी तुम्ही दिलेल्या मागण्या पूर्ण करू.