प्रचार थंडावला; पण मतदारांना पैसे वाटपाच्या आरोपावरून वातावरण तापले
कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार थंडावला असला तरी महाविकास आघाडी उमेदवाराचे उपोषण आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती या माध्यमातून शनिवारी अघोषित प्रचार केला गेला.भारतीय जनता पक्षाकडून पैशाचे वाटप केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ग्रामदैवत कसब गणपती मंदिराबाहेर उपोषण सुरू केले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी या उपोषणात सहभागी झाले होते.
हेही वाचा >>>पुणे: नागरी सेवा संयुक्त परीक्षा २०२३ द्वारे ६७३ पदांची भरती प्रक्रिया; ४ जूनला ३७ जिल्हा केंद्रावर पूर्व परीक्षा
खोटे आरोप करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना सुबुद्धी मिळावी, म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती केली. भाजपचे कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित यांच्यासह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पुण्येश्वर मंदिराचे दर्शन घेतले.
हेही वाचा >>>“कसब्यात भाजपाने पोलिसांना बरोबर घेऊन पैसे वाटले”; रविंद्र धंगेकरांचा मोठा आरोप
प्रचार बंद झाल्यावर रविवार पेठ, गंज पेठ आणि बहुतांश भागात पैशाचे वाटप करण्यात आले असून या संपूर्ण प्रकारात पोलीसही सहभागी असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. याच्या निषेधार्थ त्यांनी कसबा गणपती मंदिराच्या बाहेर धरणे आंदोलन सुरु केले. त्यावर प्रतिक्रिया म्हणून भाजपचे कार्यकर्ते दगडूशेठ गणपती मंदिरात दाखल झाले. त्यांनी गणपतीची आरती केली. भाजपवर खोटे आरोप करणाऱ्या धंगेकर यांना सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. पराभव दिसू लागल्यामुळे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर खोटे आरोप करणे सुरु केले आहे. पुराव्यानिशी आरोप सिद्ध करावेत, असे आवाहन भाजपने केले आहे.