पुणे : कात्रज भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अघोषित पाणीकपात सुरू केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यावर, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याचे स्पष्टीकरण पाणीपुरवठा विभागाने दिले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गेल्या महिन्यात तसे जाहीर सांगितले होते. असे असतानाही कात्रज, सुखसागरनगर भागातील नागरिकांना आठवड्यातून एक दिवस पाणी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या चार आठवड्यांपासून या भागातील नागरिकांच्या पाण्यात कपात केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

महापालिकेच्या वडगाव बुद्रुक येथील जलशुद्धीकरण केंद्रातून सिंहगड रस्ता, कात्रज, कोंढवा या परिसराला पाणीपुरवठा होतो. मात्र, कात्रज गावठाण, सुखसागरनगर, कोंढवा, राजस सोसायटी या परिसरात आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद राहत आहे. गेल्या चार आठवड्यांपासून दर मंगळवारी या भागातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे.‘सुखसागरनगर येथे गेल्या महिन्यात दर मंगळवारी पाणी बंद होते,’ अशी तक्रार येथील रहिवासी देवेंद्र पाटील यांनी केली. ‘कोणतीही कल्पना न देता महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अशा पद्धतीने पाणी बंद कसे ठेवू शकतो,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जात असल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला.

कोटउन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने अडचणी येत आहेत. हे टाळण्यासाठी तसेच नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. याची माहिती संबंधित भागातील नागरिकांना देण्यात येईल. – नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख

कात्रज, सुखसागरनगर भागातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अघोषित पाणीकपातीबाबत आयुक्तांची भेट घेणार आहे. – भारती कदम, माजी नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)