उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पुणे महापालिकेला अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई सुरू करावी लागली असून गुरुवारी दिवसभरात असे १३१ फलक पाडण्यात आले. जाहिरात फलक, फ्लेक्स, कापडी फलक, झेंडे, पोस्टर वगैरेवर मिळून सहा हजार ५७३ कारवाया दिवसभरात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शहरातील अनधिकृत जाहिरात फलक चोवीस तासांच्या आत काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिल्यामुळे पुणे महापालिकेतर्फे अनधिकृत फलकांवरील कारवाई गुरुवारी सकाळी आठपासून सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, बहुउद्देशीय पथक, पोलीस कर्मचारी आदी सर्वाची मदत घेऊन ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.
या कारवाईची माहिती देताना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले की, महापालिकेतर्फे गेले काही महिने अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू होतीच. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व विभागांचे मनुष्यबळ एकत्र करून आता कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिवसभरात असे १३१ अनधिकृत जाहिरात फलक काढण्यात आले. तसेच ९१८ इतर फलकांवर कारवाई करण्यात आली असून २,७८५ कापडी फलकांवरही कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी लावण्यात आलेले १,१७९ फ्लेक्स तसेच ८५ झेंडे, ११२० पोस्टर, २५५ नामफलक, किऑक्स मिळून सहा हजार ५७३ कारवाया दिवसभरात करण्यात आल्या.
डेक्कन जिमखाना परिसरात कारवाईला विरोध झाल्यामुळे तसेच महापालिकेच्या उपअभियंत्याला धक्काबुक्की झाल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. न्यायालयीन आदेशानुसार सुरू झालेली ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
संख्येबाबत नेमकी माहिती नाही
पुणे शहरात किती अनधिकृत जाहिरात फलक आहेत याबाबत नगरसेवकांकडून सातत्याने विचारणा होत असूनही त्याबाबत प्रशासनाने मौन बाळगले आहे. फलकांवर कारवाई केली, तरी सातत्याने नव्याने जाहिरात फलक उभे राहतात. त्यामुळे कारवाई सतत सुरू असली, तरी अनधिकृत फलक किती हे समजत नाही, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.                                                             फ्लेक्स उतरवले, सांगाडे तसेच
शहरातील शेकडो ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या फलकांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी फक्त जाहिरात फलक किंवा फ्लेक्स उतरवण्यात आले आहेत. हे फलक ज्या सांगाडय़ांवर उभे करण्यात आले आहेत, ते सांगाडे तसेच ठेवण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे याच सांगाडय़ांवर काही काळाने पुन्हा फलक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Story img Loader