सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरातील सीताराम पार्कमध्ये शुक्रवारी पहाटे सहा मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इमारतीतील रहिवासी वेळीच बाहेर पडल्यामुळे बचावले. एक तरुण मोटार काढण्यासाठी गेल्यामुळे मोटारीसह राडारोडय़ाखाली सापडल्याने मृत्युमुखी पडला. एक वर्षांपूर्वीच बांधलेल्या या इमारतीचा एक मजला अनधिकृत होता, तर इमारतीचा पूर्णत्वाचा दाखलाही मिळाला नव्हता. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, बांधकाम व्यावयायिक किशोरभाई वडनेर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे आंबेगाव परिसरात भूमकर मळा या ठिकाणी ही इमारत होती. बीके असोसिएट्स या बांधकाम कंपनीने ही इमारत एका वर्षांपूर्वीच बांधली होती. या इमारतीमध्ये वीस सदनिका होत्या. त्यातील आठ सदनिकांमध्ये नागरिक राहत होते. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास रहिवासी गाढ झोपेत असताना अचानक भिंती हलू लागल्या. भूकंप झाल्याचा भास झाल्याने इमारतीतील रहिवासी जागे झाले. सर्वानी जीव वाचविण्याच्या उद्देशाने इमारतीच्या बाहेर पडण्यास सुरुवात केली. काही वेळातच सर्व रहिवाशी बाहेर आले. सर्व जण बाहेर आल्यानंतर इमारत अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सर्व रहिवासी बाहेर येत असताना संदीप मोहिती हा युवक पार्किंगच्या जागेतून मोटार बाहेर काढण्यासाठी गेला. त्याच वेळेस इमारत कोसळल्याने तो ढिगाऱ्याखाली सापडला.
इमारत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिकही जागे झाले. नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांच्या जवानांना बोलविले. जवानांनी रेस्कू व्हॅनमधील उपकरणे आणि कटरच्या माध्यमातून पार्किंगमध्ये दबलेल्या संदीपला बाहेर काढले. जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी त्याला बाहेर काढले मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कपूर, पोलीस सहआयुक्त संजय कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. संबंधितांना युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या. याबाबात दैठणकर म्हणाले, की सीताराम पार्क ही इमारत कायदेशीर आहे का, याची शहानिशा केली जात आहे.
पूर्ण राडारोडा काढेपर्यंत काम सुरू
अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले, की पहाटे तीन वाजून सात मिनिटांनी इमारत पडल्याचा फोन नियंत्रण कक्षाकडे आला. त्यानुसार चार गाडय़ा आणि चाळीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी एक व्यक्ती अडकल्याचे सांगितल्यामुळे त्याला बाहेर काढले. संध्याकाळी दहा कर्मचारी या काम करीत असून संपूर्ण राडारोडा काढला जाणार आहे. या ठिकाणी कोणी अडकले का याचा शोध सुरू आहे.
बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नाही
सीताराम पार्क या इमारतीला चार मजले बांधण्याची परवानगी होती. मात्र, त्यांनी एक पार्किंग आणि पाच मजले बांधले आहेत. त्याबरोबरच इमारतीला पूर्ण बांधकाम झाल्याचा परवाना नाही. ही इमारत बांधली त्या ठिकाणी मुरमाची खाण होती. त्यामुळे त्यांनी इमारतीची पायाभरणी करताना व्यवस्थित काळजी घेतली नाही. या प्रकरणी बांधकाम व्यवसायिक व अभियंत्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी दिली.
म्हणून आमचा जीव वाचला…
इमारतीतील रहिवासी कल्पेश शहा म्हणाले, ‘‘पहाटे तीनच्या सुमारास भूकंप झाल्यासारखा भास झाला. आम्ही जीव मुठीत घेऊन पळत होतो तेव्हा फ्लॅटचे दरवाजे अचानक घट्ट झाले. इमारतीला इमारतीला तडे जाऊ लागले. मौल्यवान दागदागिने, सर्व वस्तू साडून बाहेर पळालो म्हणून आमचा जीव वाचला.’’ विनय कुलकर्णी म्हणाला, ‘‘हिंजवडी आयटी पार्कमधून पहाटे तीनच्या सुमारास आपण सीताराम पार्क परिसरात कॅबमधून उतरलो. सोसायटीतील रहिवाशी जीव मुठीत धरून पळत होते. काय सुरू आहे हे क्षणभर समजले नाही आणि अचानक समोरील इमारत कोसळली.’’
निकृष्ट बांधकामाची सहा मजली इमारत कोसळली
सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरातील सीताराम पार्कमध्ये शुक्रवारी पहाटे सहा मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इमारतीतील रहिवासी वेळीच बाहेर पडल्यामुळे बचावले.
First published on: 01-11-2014 at 03:27 IST
TOPICSकोलॅप्स
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorised building collapse crime police