निवासी सदनिका घेऊन त्यांचा व्यवसायासाठी वापर करू पाहणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध तक्रार करुनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नसल्याची तक्रार सानेवाडीमधील नागरिकांनी केली आहे. सोसायटीची परवानगी नसतानाही अनधिकृत बांधकामे करण्यात येत असल्याची माहिती सानेवाडी एरिया रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनच्या (सार्वा) सदस्या उज्ज्वल आथरे-पाटील यांनी पत्रकार ुपरिषदेत दिली.
औंध येथील सानेवाडी हा भाग पूर्णत: निवासी आहे. या ठिकाणी ५३ इमारती असून साधारण ६०० कुटुंबे राहतात. गेल्या काही महिन्यांमध्ये या भागातील काही निवासी सदनिका व्यापार करण्यासाठी वापरल्या जात असल्याचे येथील रहिवाशांच्या लक्षात आले. सानेवाडीतील रहिवाशांची आणि सार्वाची परवानगी नसतानाही सदनिकांचा व्यवसायासाठी वापर करण्याकरिता बांधकाम करण्यात येत आहे.
रहिवाशांनी सानेवाडीतील मंगेश अपार्टमेंट आणि रचना पार्क सोसायटीमधील व्यवसायासाठी सदनिकांमध्ये करण्यात येणारे बदल महापालिकेच्या लक्षात आणून दिले. रहिवाशांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. २६ मार्चला आयुक्तांची भेट घेऊन पुनर्निवेदन दिले. बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांना नोटिसा दिल्या असून मुदत संपल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले. पण अद्याप कोणतीही कारवाई न करता बांधकाम न पाडण्याची अनेक कारणे पुढे केली जात आहेत, अशी माहिती आथरे-पाटील यांनी दिली. येत्या दहा दिवसात कारवाई न झाल्यास नागरिक आयुक्तांना घेराव घालतील, असा इशारा ‘सार्वा’ तर्फे देण्यात आला आहे.