शहरांतर्गत सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमध्ये वेळोवेळी विविध प्रकारची वाहने अनधिकृतपणे वापरली जातात. या वाहतुकीला मान्यता नसल्याने त्या माध्यमातून प्रवाशांची आर्थिक लूट होण्याबरोबरच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही प्रश्न निर्माण होऊ शकतो. रेडिओ कॅब या नावाने अशाच प्रकारचा अनधिकृत वाहतुकीचा एक नवा प्रकार शहरात सुरू झाला आहे. या कॅबच्या माध्यमातून प्रवाशांची शहरांतर्गत वाहतूक करण्यात येत आहे. या वाहतुकीमुळे रिक्षाच्या व्यवसायावर गदा येत असल्याने रिक्षा पंचायतीच्या वतीने या वाहतुकीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. दुसरीकडे शहरातील प्रवाशांची गरज लक्षात घेता रेडिओ कॅबच्या वाहतुकीला अधिकृत करण्यासाठीही काही मंडळीकडून मागणी होत आहे.
रेडिओ कॅब प्रकारातील वाहनांना एका ठराविक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहलीची वाहतूक करण्याचा परवाना देण्यात येतो. या वाहनांना रिक्षा किंवा सार्वजनिक वाहतुकीतील बसप्रमाणे शहरात टप्पा वाहतूक करता येत नाही. शहरात कोणत्याही ठिकाणाहून कुठेही प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना रिक्षा व बस वाहतुकीला आहे. मात्र, या वाहतुकीच्या धर्तीवरच सध्या रेडिओ कॅबची वाहतूक सुरू झाली आहे. या वाहनांकडून टप्पा वाहतूक होत असून, त्याबाबतच्या जाहिरातीही सध्या दिसून येत आहेत. शहरात अशा कोणत्याही वाहनांना प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ही वाहतूक अनधिकृत असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या वाहनांवर ठोस कारवाई होत नसल्याचे दिसते आहे.
रिक्षा पंचायतीच्या वतीने रेडिओ कॅबच्या विरोधात भूमिका घेण्यात आली आहे. पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन रेडिओ कॅबच्या अनधिकृत वाहतुकीबाबतची माहिती देण्यात आली. या विषयावर येत्या आठवडय़ात बैठक घेण्याचे आश्वासन बापट यांनी पंचायतीला दिले आहे. प्रती किलोमीटर दरानुसार ही कॅब शहरातही उपलब्ध असल्याच्या जाहिराती करण्यात येत आहेत. या वाहनांकडून शहरातील बस व रेल्वे स्थानके, विमानतळ आदी ठिकाणाहून प्रवासी घेतले जातात. रिक्षा चालकांची भाकरी त्यांच्या डोळ्यादेखत पळविली जात असल्याने या वाहतुकीविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या रेडिओ कॅबला शहरांतर्गत व्यवसायास प्रतिबंध करून सार्वजनिक वाहतुकीतील वाहनांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी नितीन पवार यांनी केली आहे.
रेडिओ कॅबला विरोध होत असतानाच दुसरीकडे काही मंडळी मात्र या वाहतुकीला अधिकृत करण्याची मागणीही करीत आहेत. पुणे शहर विस्तारत असताना सार्वजनिक वाहतुकीमध्ये वेगवेगळ्या वाहनांची गरज निर्माण झाली आहे. प्रवाशांना शहरांतर्गत वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था हवी असल्याने मुंबईप्रमाणे पुण्यातही रेडिओ कॅबच्या वाहतुकीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
रेडिओ कॅब.. अनधिकृत वाहतुकीचा नवा प्रकार!
रेडिओ कॅब या नावाने अशाच प्रकारचा अनधिकृत वाहतुकीचा एक नवा प्रकार शहरात सुरू झाला आहे. या कॅबच्या माध्यमातून प्रवाशांची शहरांतर्गत वाहतूक करण्यात येत आहे.
First published on: 15-01-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorised radio cab rickshaw panchayat girish bapat