पुण्यात जाहिरात फलकाचा सांगाडा कोसळून चार नागरिकांचा हकनाक बळी गेल्यानंतर पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत जाहिरात फलकांवरील कारवाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका हद्दीत अठराशे अधिकृत फलक आहेत, तर सव्वातीनशे अनधिकृत जाहिरात फलक आहेत. जाहिरात फलकांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असताना महापालिका अनधिकृत फलकांवरील कारवाईसाठी गंभीर नसल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. महापालिकेकडून अनधिकृत फलकांची संख्या सव्वातीनशे असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त संख्येने अनधिकृत फलक शहरात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत, धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांची संख्या मोठी आहे. राजकीय लागेबांधे आणि प्रशासकीय हतबलता यामुळे अशा जाहिरात फलकांवर महापालिकेकडून कारवाई केली जात नाही. एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी उभे करण्यात येणारे जाहिरात फलक किंवा फ्लेक्स आणि विनापरवाना जाहिरात फलक उभे करुन त्यापासून उत्पन्न मिळवणारे फलक असे फलकांचे दोन प्रकार शहरात आहेत. महापालिकेकडे फलकांवरील कारवाईची माहिती ही सरसकट स्वरुपाची आहे. महापालिकेकडून फ्लेक्स आणि जाहिरात फलक यांच्यावरील कारवाईची संयुक्त माहिती आहे. महापालिकेने गेल्या सहा महिन्यात केवळ सव्वाशे अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसात जाहिरात फलक कोसळून दोन नागरिकांचा बळी शहरामध्ये गेला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सव्वातीनशे अनधिकृत जाहिरात फलक आहेत. त्यासंबंधीचे सर्वेक्षण सुरु आहे. गेल्या सहा महिन्यात सव्वाशे फलकांवर कारवाई केली आहे, तसेच बावीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढे सर्व अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करुन ते काढून घेण्यात येणार आहेत.    – विजय खोराटे, सहायक आयुक्त, महापालिका

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जाहिरात फलकांची पाहणी करावी. कमकुवत असलेल्या जाहिरात फलकांचे सांगाडे सुरक्षित करण्याचे आदेश संबंधित जाहिरात संस्थेला द्यावेत. तसेच अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या संस्थेवर कारवाई करावी.   – दत्ता साने, विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorized promotional hoarding in pune
Show comments