फलक रेल्वेच्या जागांवर, धोका मात्र रस्त्यावरील नागरिकांना

जाहिरात फलक रेल्वेच्या जागेत असल्याने त्याबाबत इतर कोणत्याही यंत्रणांच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत असल्याने जाहिरात फलकांबाबत रेल्वेचा ‘हम करे सो कायदा’ असेच धोरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. फलक रेल्वेच्या जागेत असले, तरी त्याचा धोका शहरातील नागरिकांना असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेच्या जागांवरील फलकांबाबतही शहरातील इतर यंत्रणांच्या परवानगीचे बंधन घालण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

रेल्वेच्या जागेतील जाहिरात फलक काढण्याचे काम सुरू असताना ५ ऑक्टोबरला शाहीर अमर शेख चौकातील फलक कोसळून चार नागरिकांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर पोलिसांनी रेल्वेच्या दोघांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे रेल्वेच्या वतीनेही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत असून, येत्या १० दिवसांत ही समिती अंतिम अहवाल सादर करणार आहे. या भीषण दुर्घटनेनंतर शहरातील सर्वच आणि प्रामुख्याने रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पुणे रेल्वे स्थानक, लोहमार्गाच्या जवळचा परिसर, कोरेगाव पार्क, आरटीओ समोरील चौक, स्थानकाच्या मागील भाग आदी अनेक ठिकाणी रेल्वेच्या जागांमध्ये मोठे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. हे सर्वच फलक अधिकृत असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. दुर्घटना घडलेल्या फलकाबाबत संबंधित जाहिरात संस्थेने संरचनात्मक लेखापरीक्षण सादर केले नव्हते. त्यामुळे या फलकासह पाच फलक काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. फलक काढण्याचे काम दिलेल्या संस्थेच्या हलगर्जीपणामुळे तो कोसळल्याचा दावाही रेल्वेने केला आहे. हा फलक रेल्वेच्या जागेत असल्याने आणि याच जागेत तो पाडायचा असल्याने इतर यंत्रणांची परवानगी न घेतल्याची कबुलीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यातून रेल्वेच्या मनमानी कारभाराचा गंभीर नमुना समोर आला आहे.

फलक रेल्वेच्या जागेत असले, तरी ते रस्त्याच्या अगदी लगत आहेत. त्यामुळे त्याचा धोका नागरिकांसाठी आहेच. फलकांची सुरक्षितता, त्याची पाहणी आणि ते लावणे किंवा काढण्याची सर्व नियमावली एकटय़ा रेल्वेच्याच हातात आहे. दुर्घटनाग्रस्त फलक रेल्वेच्या जागेत पाडण्याचे नियोजन होते. मात्र, त्याबाबत इतर कोणत्याही यंत्रणांना कळविण्यात आले नव्हते. साधी वाहतूक पोलिसांचीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वेच्या ‘हम करे सो कायदा’ या धोरणामुळेच नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जाहिरात फलक रेल्वेच्या जागेत असले, तरी त्याचा परिणाम नागरिकांवर होणार असल्यास फलकाच्या उभारणीबाबत वाहतूक पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय आवश्यक आहे. मात्र, रेल्वेकडून याबाबत मनमानी कारभार करण्यात येतो आहे. त्याचाच परिणाम म्हणून फलकाची दुर्घटना झाली. रस्त्यालगत फलक लावताना फलकाच्या उंचीपेक्षा दहा फूट अधिक अंतर सोडून तो लावला गेला पाहिजे. हा नियमही रेल्वेकडून पाळला जात नाही.   – हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा