शाळकरी मुलीचा पाठलाग करणाऱ्या सडक सख्याहरींना जाब विचारणाऱ्या काकाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कात्रज भागात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित पाटेकर, तुषार येनपुरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या १३ वर्षांच्या मुलीचा आरोपी पाठलाग करुन तिची छेड काढत होते. मुलीने या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मुलीच्या काकांनी कात्रज परिसरातील दत्तनगर भागात आरोपी पाटेकर, येनपुरे यांना अडवले. मुलीची छेड का काढता. तिला त्रास देऊ नका, असे त्यांनी आरोपींना सांगितले. त्या वेळी आरोपींनी काकाला शिवीगाळ केली.
काकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यांच्यावर कोयता उगारुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक रसाळ तपास करत आहेत.