वाहतुकीचे नियम मोडल्यास आता हेल्मेट न घातल्याचा शंभर रुपये दंड प्रत्येकाकडून घेतला जाणार आहे. या नियमाची अंमलबजावणी रविवारपासून केली जाणार आहे. शहरातील अपघातांमध्ये डोक्यास मार लागून मृत्यू होण्याच्या घटना दिसून येत असल्यामुळे हा निर्णय वाहतूक शाखेकडून घेण्यात आला आहे.
पुणे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी ‘लोकसत्ता- आयडिया एक्सचेंज’ कार्यक्रमात ‘जनजागृती करून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाईल,’ अशी घोषणा केली होती. या पाठोपाठ पुणे पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवर वेगाने वाहन चालविणे, निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे अपघात होताना दिसून येत आहेत. यामध्ये दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे. दुचाकी चालक रस्त्यावर पडल्यास त्याच्या डोक्यास मार लागून मृत्यू होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. मंगळवार पेठेतील एनआरटी जनरल स्टोअर्ससमोर शुक्रवारी रात्री हेल्मेट न घातल्यामुळेच नितीन शियाळे (वय ३०, रा. संगमवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वाहतूक शाखेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता यापुढे दुचाकी चालकाने वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यास त्याचा दंड आणि हेल्मेट न घातल्याचा दंड वसुल केला जाणार आहे. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रविवारपासून या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.दुचाकीस्वारांनी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पोलीस कारवाई टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक (नियोजन) आर. एस. कामीरे यांनी केले आहे.  
दरम्यान, पुणे वाहतूक शाखेकडून यापूर्वीही वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यानंतर त्या दंडाबरोबर हेल्मेट न घातल्याचा दंड आकारला जात होता. मात्र, ही कारवाई नियमित केली जात नव्हती. आता यापुढे इतर दंडासोबत  हेल्मेट न घातल्याचा दंड नियमितपणे वसूल केला जाणार आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी २०१३ मध्ये ३९ हजार ६८९ दुचाकी चालकांकडून हेल्मेट न घातल्याची कारवाई केली असून त्यांच्याकडून ४१ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, यावर्षी आतापर्यंत ६२२ जणांवर कारवाई करून ९८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.