पिंपरी-चिंचवड परिसरात मागील दोन महिन्यांत इमारतीवरून पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन बांधकाम मजूर आणि एका घरमालकाचा समावेश आहे. या घटनेमुळे बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. या परिसरात उद्योग-धंदे आणि इमारती दिवसेंदिवस वाढतच आहेत. याठिकाणी कामानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून कामगार वर्ग येत आहे. यात मोठ्या प्रमाणात नव्या बांधकामावर काम करणाऱ्या मजूरांचा समावेश असतो. शहराच्या भोसरी, काळेवाडी, सांगवी, राहटणी, थेरगाव, पिंपळे गुरव, मोशी, चिखली, या परिसरात कामगार काम करताना दिसते. मात्र, गेल्या काही दिवसांत बांधकाम करताना कामगारांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कामगारांचे कुटूंब हे उघड्यावर येत आहे. त्यांचा विमा, सुरक्षेविषयीचा प्रश्न ही प्रक्रिया गतीशील होणार का? हे पाहावे लागेल.

पिंपळे सौदागर येथे २२ मे सायंकाळी सातच्या सुमारास आठव्या मजल्यावरून पडून संतोष दरगो राय यादव (वय ३८ रा.पिंपळे सौदागर) या कामगाराचा मृत्यू झाला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ तारखेला पिंपळे सौदागर याठिकाणीच एमएनजीएल गॅस पाईप लाईनचे काम करत असताना सातव्या मजल्यावरून पडून सुरज तिवारी या ३० वर्षीय तरुण कामगाराने आपले प्राण गमावले. यापूर्वी २४ मार्च रोजी बांधकाम सुरू असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने रवी यलप्पा माने या कामगाराचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे या तिन्ही घटना पिंपळे सौदागर येथेच घडल्या आहेत. मात्र, अद्यापही मृत कामगारांनी सुरक्षा विषयी नियम पाळले होते का? याचे उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सुरक्षितेतेविषयीच्या नियमांचे उल्लंघन करुन कामगारांकडून काम करुन घेतले जाते का? हे पाहणे गरजेचे झाले आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, यासाठी कंपनीसह कामगारवर्गाने सुरक्षिततेच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. तसेच कामगारांच्या सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनानेही लक्ष देणे गरजेचे आहे.

२३ एप्रिल रोजी बांधकामावर पाणी मारण्याचे काम करत असताना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पाय घसरुन घरमालकाचा मृत्यू झाला होता. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. विजय मोरे अस मृत व्यक्तीचं नाव होते. २९ जुलै २०१६ रोजी बालेवाडी येथे स्लॅब कोसळून ९ कामगारांचा मृत्यू झाला होता. यासारखी घटना होऊ नये, म्हणून नुकत्याच झालेल्या अपघांची कारणे शोधून योग्य उपाय शोधणे आवश्यक आहे.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under construction building accident issue in pimpri chinchwad