सणस मैदानासमोरील गरवारे बालभवन ओम चॅरिटेबल ट्रस्टला नव्याण्णव वर्षांच्या कराराने देता येणार नाही, असा अभिप्राय महापालिका आयुक्तांनी दिल्यामुळे बालभवनच्या जागेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही जागा नव्याण्णव वर्षांसाठी बालभवनला देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला होता. मात्र, जागा वाटप नियमावलीच्या बाहेर जाऊन दीर्घ मुदतीने ही जागा ट्रस्टला देता येणार नाही, त्यासाठी निविदा काढाव्या लागतील, असे आयुक्तांचे मत आहे.
महापालिकेने गरवारे बालभवन ही जागा ओम चॅरिटेबल ट्रस्टला १९८५ पासून वेळोवेळी मुदतवाढ देऊन भाडे तत्त्वावर दिली आहे. त्यासाठी करण्यात आलेला अंतिम करार ३० जून २००९ रोजी संपला. त्यानंतरच्या दिनांकापासून ही जागा ट्रस्टला नव्याण्णव वर्षांच्या कराराने देण्याचा ठराव स्थायी समितीने ३ जून २०१२ रोजी संमत केला होता. हा ठराव प्रशासनाकडे अभिप्रायासाठी गेल्यानंतर आयुक्तांनी त्याबाबत प्रतिकूल अभिप्राय दिला आहे.
महापालिकेने २००८ साली तयार केलेल्या जागावाटप नियमावलीनुसार, भाडय़ाने देण्यात आलेल्या जागांची मुदत संपल्यानंतर या जागा पुन्हा भाडय़ाने द्यायच्या झाल्यास त्यासाठी निविदा काढणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्वाधिक दर आधीच्याच वापरकर्त्यांने दिला, तर त्यालाच संबंधित जागा पुन्हा दिली जाते. त्यानुसार गरवारे बालभवनच्या जागेसाठीही निविदा प्रक्रिया राबवावी लागेल. त्यात ज्या निविदा भरणाऱ्याने सर्वाधिक रकमेची निविदा भरली असेल, त्याला ही जागा दिली जाईल किंवा तेवढी (सर्वाधिक) रक्कम ओम चॅरिटेबल ट्रस्टने देऊ केली, तर त्यांना ही जागा देता येऊ शकेल, असा अभिप्राय आयुक्तांनी दिला आहे.