पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रस्तावित भुयारी मार्गाचे काम येत्या काही दिवसांत महापालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे. त्याबरोबरच शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे शंभर खांब उभारण्यात येणार असून खांब उभारणीच्या कामांना गती द्यावी, अशी सूचना महापालिकेने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला केली आहे.

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेला अडथळा ठरत असल्याने विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल जमीनदोस्त करण्यात आला. येथे दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित असून अद्यापही उड्डाणपुलाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. उड्डाणपूल पाडल्यानंतर वाहतूक सुधारणा आराखडा करण्यात आला. त्याअंतर्गत विद्यापीठ चौकात भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. हा खर्च महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. या कामांचे नियोजन करण्यात आले असून येत्या काही दिवसांत भुयारी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. भुयारी मार्गाचा खर्च महापालिका करणार असून त्यासाठी मेट्रोचे काम करणाऱ्या सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

सार्वजनिक खासगी लोकसहभागातून शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिका प्रकल्प साकारण्यात येणार आहे. मेट्रो मार्गिकेच्या खांब उभारणीची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो मार्गिकेचे शंभर खांब आहेत. मेट्रोच्या कामाबाबत महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांत बैठक झाली. त्या वेळी गणेशखिंड रस्त्यावरील खांब उभारणीची प्रक्रिया पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वेगाने पूर्ण करावी, अशी सूचना आयुक्तांनी केली.

काम तातडीने पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करणे, आवश्यकता असेल तेथील पदपथ काढणे, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे, शासकीय कार्यालयांच्या जागा ताब्यात घेणे आणि केंद्र सरकारच्या काही संस्थांचे स्थलांतर करणे यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. गणेशखिंड रस्त्यावर सध्या नऊ मीटरचे बॅरिकेड लावण्यात आले आहेत. ते तीन मीटरचे लावण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.