पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून झालेली दावेदारी, आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मनापासून काम करतील की नाही, याची भीती महायुतीला सतावत आहे. यामुळेच महायुतीचे पदाधिकारी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे काम करत आहेत का, प्रचारात सक्रियपणे उतरलेत का, यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याची बारकाईने माहिती घेण्याकरिता सहा जणांचे खास पथक दिल्लीहून मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहे. हे पथक पक्षनेतृत्वाला गोपनीय अहवाल सादर करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. मावळमध्ये १५ वर्षांपासून कमळ चिन्ह नसून या वेळी कमळावर लढणारा उमेदवार देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, बापू भेगडे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. परंतु, मावळ मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडेच कायम राहिला. शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांना, तर ठाकरे गटाकडून माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळाली आहे.

हेही वाचा – कोव्हिशिल्ड लशीमुळे धोका किती? कोविड कृती दलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकरांनी दिलं उत्तर…

मतदारसंघ मिळाला नसल्याने नाराज झालेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अखेर महिनाभरानंतर महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार सुरू केला खरा; परंतु, अद्यापही अनेक जण प्रचारापासून अलिप्त आणि विरोधात काम करत असल्याचे दिसत आहे. वाघेरे हे अनेक वर्षे राष्ट्रवादीमध्ये होते. शहर भाजपमधील प्रमुख पदाधिकारीही राष्ट्रवादीत होते. त्यामुळे वाघेरे यांचे राष्ट्रवादी आणि भाजपमधील पदाधिकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नातीगोतीही आहेत. त्यामुळे महायुतीचे काही कार्यकर्ते वाघेरे यांचे काम करताना दिसून येत आहेत. परिणामी, महायुतीत अस्वस्थता वाढली असून, दिल्लीतून सहा जणांचे पथक मावळात दाखल झाले आहे.

हे पथक १० मेपर्यंत मुक्कामी असणार आहे. प्रामाणिकपणे काम करीत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामांची नोंद या पथकामार्फत घेतली जाणार आहे. त्यांच्या कामगिरीची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. प्रचारापासून अलिप्त, विरोधात काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची माहिती घेतली जात आहे. त्या संदर्भातील अहवाल संबंधित घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात येणार आहे. विरोधात काम करणाऱ्या व्यक्तीला महायुतीकडून संधी देण्यात येणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट अवघड का होता? रणदीप हुडा यांनी सांगितले कारण…

पथकाचे बारकाईने लक्ष

दिल्लीस्थित सहा जणांचे पथक शहरात दाखल झाले आहे. सहाही विधानसभा मतदारसंघप्रमुखांच्या घरी भेट दिली जात आहे. किती कार्यकर्ते काम करत आहेत, अर्ज भरण्यासाठी काढलेल्या पदयात्रेत किती लोक होते, सामान्य कार्यकर्ते-बूथप्रमुख होते का, याची माहिती घेतली जात आहे. भाजपकडूनच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्याही कामाचा आढावा घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uneasiness in mahayuti in maval a team of six people entered from delhi pune print news ggy 03 ssb
Show comments