पुणे : तीव्र हवामानामुळे २०२४ मध्ये जगभरातील सातपैकी एका विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केवळ भारतात उष्णतेच्या लाटांमुळे ५ कोटी ४७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला फटका बसल्याचे निरीक्षण युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडच्या (युनिसेफ) अहवालातून नोंदवण्यात आहे. तसेच २०२४ मध्ये जगभरात शालेय शिक्षणातील बाधा ठरण्यास उष्णतेच्या लाटा हा घटक सर्वाधिक कारणीभूत ठरत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युनिसेफने ‘लर्निंग इंटरप्टेड : ग्लोबल स्नॅपशॉट ऑफ क्लायमेट रिलेटेड स्कूल डिस्रप्शन इन २०२४’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. या अहवालात तीव्र हवामानामुळे जगभरातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार उष्णतेच्या लाटांमुळे जगरातील १७१ दशलक्ष विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित झाले. तसेच वर्षभरात एप्रिलमध्ये शिक्षणाला सर्वाधिक फटका बसला. उष्णतेच्या लाटांमुळे भारतासह बांगलादेश, कंबोडिया, फिलिपिन्स आणि थायलंड या देशातील किमान ११८ दशलश विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला.

हवामान बदलांमुळे होणाऱ्या प्रतिकूल परिणामांबाबत भारत अत्यंत असुरक्षित आहे. २०२१ च्या युनिसेफ चिल्ड्रनच्या हवामान जोखीम निर्देशांकात १६३ देशांमध्ये भारत २६ व्या स्थानी आहे. पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळांसारख्या आपत्तींमुळे शाळांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. प्रचंड उष्णता आणि वायू प्रदूषणासारख्या पर्यावरणीय ताणांचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन शाळेतील उपस्थिती, शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होत आहे. भारत सरकारने हवामान बदलाशी संबंधित घटक राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात समाविष्ट केले आहेत. युनिसेफ १२ राज्यांमध्ये व्यापक शाळा सुरक्षा कार्यक्रम (सीएसएसपी) अमलात आणण्यासाठी सरकारसह काम करत आहे. या अंतर्गत हवामान बदलाशी संबंधित घटकांचा समावेश आहे. त्यात सुरक्षित शाळा आणि शैक्षणिक वातावरणावर भर देऊन मुलांना बदलाचे प्रवर्तक म्हणून सक्षम केले जाते. केवळ २०२४ मध्ये या कार्यक्रमांतर्गत १ लाख २१ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे युनिसेफने अहवालात नमूद केले आहे.

हवामान बदलाचा शिक्षणावरील परिणामांसंदर्भातील निरीक्षणे

जागतिक स्तरावर, २०२४ मध्ये बालवाडीपासून ते उच्च-माध्यमिक वर्गापर्यंतच्या किमान २४.२ कोटी विद्यार्थ्यांचे तीव्र हवामानामुळे शिक्षण विस्कळीत.

२४.२ कोटी विद्यार्थ्यांपैकी ७४ टक्के विद्यार्थी अल्प आणि मध्यम-उत्पन्न देशांतील. ८५ देशांमध्ये हवामान आपत्तीचा शाळांवर परिणाम, तर २३ देशांमध्ये वारंवार शाळा बंद होण्याच्या घटना.

किमान २० देशांमध्ये राष्ट्रीय स्तरावर शाळांचे कामकाज विस्कळीत. २०२४ मध्ये उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळे, वादळे आणि पुरामुळे राष्ट्रीय स्तरावर शाळा बंद.

हवामानाच्या तीव्र घटनांमुळे दक्षिण आशिया हा सर्वाधिक प्रभावित प्रदेश. या प्रदेशातील १२.८ कोटी विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले. त्या खालोखाल पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेशातील ५ कोटी विद्यार्थ्यांना फटका.

आफ्रिकेत आधीच १०.७ कोटी मुले शाळेबाहेर असताना २०१४ मध्ये हवामानाशी संबंधित अडचणींमुळे आणखी २ कोटी मुले शाळा सोडण्याचा धोका.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unicef report observed that education of more than 54 7 million students has affected due to heat waves in india pune print news sud 02 ccp 14 sud 02