पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटी रुपयांची तरतूद जाहीर झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज (भुयारी) या मेट्रो मार्गिकांय्या कामांना आता वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनीदेखील नवीन आर्थिक वर्षातील तरतुदीच्या मागणीनुसार अपेक्षित निधी प्राप्त झाला असल्याची स्पष्टोक्ती दिली असून, पुण्यातील या दोन्ही प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी शनिवारी (१ फेब्रुवारी) जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात वाहतूक, दळणवळण, उद्याोग, माहिती तंत्रज्ञान, आणि इतर सुविधांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तरतुदींमध्ये पुणे मेट्रोच्या विस्तारासाठी विशेष तरतूद केल्याचे दिसून आले. याबाबत अधिक माहिती सांगताना हर्डीकर म्हणाले, ‘पुण्यातील मेट्रो विस्ताराच्या अनुषंगाने दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकांच्या कामासाठी साधारणत: चार हजार कोटी रुपयांची कामे मंजूर आहेत. त्यापैकी ७१५ कोटी आणि उर्वरित भागभांडवल असे मिळून ८३७ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे, तर प्रस्तावित प्रकल्पातील करार जसेजसे मार्गी लागतील त्या प्रमाणे निधी प्राप्त होत जाईल. त्यामुळे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकांचे विस्तारीकरण वेगाने होणार आहे.’
‘प्रत्यक्षात पुणे मेट्रोच्या विस्तारीकरण प्रकल्पासाठी जेवढ्या निधीची मागणी केली आहे, त्या मार्गिकांच्या टप्प्याटप्प्यातील कामांच्या मंजुरीनुसार निधी प्राप्त होत आहे. मेट्रो विस्तारासाठी निधी प्राप्त होत आहे. त्यानुसार यंदाच्या वर्षात सुरू करण्यात आलेल्या पीसीएमसी ते निगडीदरम्यान ४.४१ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गिका प्रकल्प आणि स्वारगेट ते कात्रय हा पाच किलोमीटर लांबीचा भुयारी प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येईल,’ असे हर्डीकर यांनी सांगितले.