पुणे : भारतीय जनता पक्षाच्या मिशन बारामती मोहिमेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नोव्हेंबर महिनाअखेर पुन्हा बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा निश्चित झाला असून दोन महिन्यांतील त्यांचा हा दुसरा दौरा आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल शुक्रवारपासून दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातील विविध विधानसभा मतदार संघांना पटेल भेटी देणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने राज्यातील काही मतदार संघांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपविण्यात आली असून दोन महिन्यांपूर्वी सीतारामन यांनी बारामती लोकसभा मतदार संघांचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला हाेता. त्यानंतर आता पुन्हा त्या नोव्हेंबर महिनाअखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्या दृष्टीने या दौऱ्याची पूर्वतयारी आणि आढावा घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल शुक्रवारपासून दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत, असे बारामती लोकसभा मतदार संघाचे भाजपचे प्रमुख अविनाश मोटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा : डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतील अधिकाऱ्याची उलटतपासणी

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल त्यासाठी ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी बारामतीत मुक्कामी आहेत. शुक्रवारी (११ नोव्हेंबर) खडकवासला, भोर, पुरंदर, जेजुरीमार्गे पटेल बारामतीत दाखल होती. बारामतीचे प्रभारी आमदार राम शिंदे, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे, वासुदेव काळे, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर या वेळी उपस्थित राहणार आहेत.
पटेल सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील राष्ट्रवादीचे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात असलेल्या शेतकरी कृती समितीच्या प्रमुखांना भेटणार आहेत. राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, माळेगावचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, सतीश काकडे यांची बरोबरही पटेल यांची चर्चा होणार आहे. शनिवारी इंदापूर, भिगवण, दौंड येथे त्यांचा दौरा आहे, असे मोटे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union finance minister nirmala sitharaman on a visit to baramati under the bjp mission pune print news tmb 01