पुणे : ‘भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेले विद्यार्थी परदेशामध्ये सेवा देतात, असे चित्र आहे. त्यामुळे देशाला अधिक संख्येने डाॅक्टर मिळावेत यासाठी पुढील पाच वर्षांत वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणाच्या ७५ हजार जागा वाढविल्या जाणार आहेत’, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी शनिवारी केले. ‘प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. व्यावसायिक शिक्षण हे व्यक्तिगत फायद्याचे आहे. त्यामुळे समाजाला परत करणे हे तुमचे उत्तरदायीत्व असले पाहिजे’, अशी अपेक्षा नड्डा यांनी व्यक्त केली.
लवळे येथील सिम्बायोसिस रुग्णालय व संशोधन केंद्राच्या मूत्रपिंड (नेफ्रोलॉजी) आणि मूत्रविकार (युरोलॉजी) केंद्राचे उद्घाटन जेय पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी नड्डा बोलत होते. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डाॅ. विद्या येरवडेकर, वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रमुख डाॅ. राजीव येरवडेकर या वेळी उपस्थित होते.
नड्डा म्हणाले, ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांनुसार (एनडब्ल्यूएएस) सध्या ३० हजार आयुष्मान आरोग्य मंदिर आहेत आणि आमचे लक्ष्य हे लवकरच १ लाख ७५ हजार आयुष्मान आरोग्य मंदिरे निर्माण करण्याचे आहे जेणेकरून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करता येईल. याद्वारे लोकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच विस्तारित आरोग्य सेवा देण्यात येईल.’
‘प्रत्येक गोष्ट मोफत देणे शक्य नाही परंतु सिम्बायोसिस आरोग्यधाममध्ये त्यांनी ते शक्य केले आहे. महिलांसाठी महाविद्यालय ही उत्तम गोष्ट साकारली आहे. सध्या हे केंद्र स्वरूपात असले तरी भविष्यात ही संस्था होईल. सिम्बायोसिस सारख्या संस्था आणि सरकार यांनी एकत्र येऊन आरोग्य क्षेत्रात सर्वसमावेशक स्वरूपाची धोरणे तयार करावीत’, अशी अपेक्षा नड्डा यांनी व्यक्त केली. डाॅ. मुजुमदार, डाॅ. विद्या येरवडेकर आणि डाॅ. राजीव येरवडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
अनेक वर्षे या देशात एकच भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी पाच एम्स सुरू केल्या. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात गेल्या दहा वर्षांत १६ एम्स सुरू झाल्या आहेत. – जे. पी. नड्डा, केंद्रीय आरोग्यमंत्री