पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे नऱ्हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाअंतर्गत साकारण्यात आलेल्या सरकारवाड्याची पाहणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
हेही वाचा- पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्यबाण मिळालं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘शिवसृष्टी’ हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून त्याचा पहिला टप्प्या असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन आणि बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. याशिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड आणि विशाळगड या गड–किल्ल्यांची सफर घडविणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग, शिव छत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन ‘रणांगण’, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभविता येईल. तसेच मॅड मॅपिंगद्वारे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाषण ऐकण्याची अनुभुती देखील मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात ज्या किल्यांना अत्यंत महत्वाचे स्थान होते अशा काही किल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्या किल्ल्यांच्या मागे भव्य एलईडी स्क्रीनवर प्रोजेक्शनच्या सहाय्याने मँपिंग केलेले आहे. यासाठी होलोग्राफी, अॅनिमेट्रोनिक्स, मोशन सिम्युलेशन, ३ डी प्रोजेक्शन, मॅपिंग अशा अत्याधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. नऱ्हे – आंबेगाव येथे असलेली ही ‘शिवसृष्टी’ एकूण चार टप्प्यात उभारण्यात येणार आहे.