पुणे : देशभरात गाजलेल्या पुण्यातील बिटकॉइन प्रकरणाचा उल्लेखनीय तपास करून दोषारोपपत्र दाखल करणारे सायबर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण आणि अल सुफाच्या दोन दहशतवाद्यांना कोथरूडमधून अटक करणारे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना  केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. राज्य पोलीस दलातील अकरा अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाले असून, त्यामध्ये अंकुश चिंतामण आणि हेमंत पाटील यांचा समावेश आहे.  हेमंत पाटील सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत राबोडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

दिल्ली येथे राहणाऱ्या भारद्वाजबंधूंनी २०१६-१७ मध्ये बिटकॉइन चलनामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक स्वीकारण्यासाठी एजंटचे जाळे तयार केले होते. त्यांनी देशभरातून लाखो बिटकॉइन गुंतवणूक म्हणून स्वीकारले होते. पुढे या आरोपींनी गुंतवणूकदारांचे गुंतविलेले बिटकॉइन, तसेच परतावाही न देता गुंतवणूकदारांची फसवणूक केली. याप्रकरणी पुणे शहरात २०१८ मध्ये निगडी आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यांचा तपास सायबर पोलीस ठाण्याकडून करण्यात आला होता. हा तपास करण्यामध्ये आणि दोषारोपपत्र दाखल करण्यामध्ये सायबर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

हेही वाचा…महाविद्यालये, विद्यापीठांच्या अनास्थेचा विद्यार्थ्यांना फटका… झाले काय?

u

जुलै २०२३ मध्ये कोथरूड येथे दुचाकी चोरणाऱ्या दोघांकडे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी चौकशी केली असता ते दोघेही अल सुफा संघटनेचे दहशतवादी असल्याचे उघड झाले होते. मिठानगर येथील त्यांच्या घरातून घातपातासाठी आवश्यक साहित्य जप्त करण्यात आले होते. जयपूर येथे बाॅम्बस्फोट घडविण्याच्या गुन्ह्यात ते फरारी आरोपी होते. त्यांची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून हेमंत पाटील यांनी तपास करून मोठा दहशतवादी कट उघडकीस आणला. हा तपास विशेष मोहीम अंतर्गत पदकासाठी पात्र ठरला.