पुणे : अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सनदी लेखाकार (सीए) तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी केंद्रीय कामगार मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

केंद्रीय कामगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी समाज माध्यमावर याबाबत गुरुवारी घोषणा केली आहे. ॲना सेबास्टियन पेरायिल (वय २६) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ईवाय इंडियाच्या पुणे कार्यालयात ॲना यंदा १८ मार्चला रुजू झाली होती. तिचा २० जुलैला मृत्यू झाला होता. तिच्या आईने ईवाय इंडियाच्या प्रमुखांना लिहिलेला ई-मेल समाजमाध्यमांत व्हायरल झाला असून, याप्रकरणी कंपनीच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा – Minor Girls Gangrape In Pune : बारामतीतील अल्पवयीन मुलींवर पुण्यात सामूहिक अत्याचार, तिघे अटकेत

या प्रकरणी माजी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करीत या प्रकरणी केंद्रीय कामगार मंत्रालयाला चौकशी करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत केंद्रीय कामगार राज्यमंत्री करंदलाजे यांनी चौकशी करण्याचे जाहीर केले. या प्रकरणी न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

हेही वाचा – पुणे : टँकरच्या धडकेत बांधकाम कंपनीतील व्यवस्थापकाचा मृत्यू ; बाह्यवळण मार्गावरील वडगाव पुलावर अपघात

ईवाय इंडियाचे म्हणणे काय?

ईवाय ग्लोबलची सदस्य कंपनी एस. आर. बाटलीबोईमधील लेखापरीक्षण विभागात ॲना काम करीत होती. तिची कंपनीतील कारकीर्द दु:खदपणे अचानक संपली. यामुळे कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. तिच्या कुटुंबीयांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेले मुद्दे आम्ही अतिशय गंभीरपणे घेतले आहेत. भारतात ईवायच्या सदस्य कंपन्यांत १ लाख कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या हिताला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे ईवाय इंडिया कंपनीने म्हटले आहे.