पुणे : केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे ‘विकसित भारत’ अभियानाअंतर्गत मॉडर्न महाविद्यालयात झालेल्या ‘युवा कनेक्ट’ कार्यक्रमात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, प्रा. निवेदिता एकबोटे या वेळी उपस्थित होते. रिजिजू यांनी २०४७मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठीच्या कामी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
विकसित भारतासाठी तरुणांनी त्यांना जे योग्य वाटते ते करावे. राजकारणी करतात ते राजकारण असा गैरसमज आहे. पण राजकारण सगळीकडे आहे. खेळातही राजकारण आहेच. उद्योग क्षेत्रातील राजकारणाची तर कल्पनाही करता येणार नाही. शिक्षण क्षेत्रात, प्राध्यापकांमध्येही राजकारण होते. तरुणांना निवडणुकीच्या राजकारणात उतरायचे असल्यास स्वागतच आहे, असे मत रिजिजू यांनी मांडले.
हेही वाचा >>> पुणे-बेंगळुरू बाह्यवळणावरील वाहतूक कोंडी फुटणार? तीनशे कोटींच्या निधीला तत्त्वत: मंजुरी
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित (स्टेम) या क्षेत्रावर किती भर दिला जातो त्यावर देशाचा विकास अवलंबून आहे. सेमी कंडक्टर क्षेत्रात भारताने संधी गमावली होती. मात्र, आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील संधी गमावून चालणार नाही. संशोधनावर भर दिल्यासच वेगाने विकास शक्य आहे, अशी भूमिका रिरिजू यांनी मांडली. तसेच देशातील जवळपास २५ टक्के लोकसंख्या तरुणांची आहे. मात्र, या तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणे आव्हानात्मक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा >>> खड्ड्यांची धास्ती ‘पीएमआरडीएला’ही! दुरवस्थेला मेट्रोला जबाबदार ठरवून रस्ता दुरुस्तीसंदर्भात नोटीस
रिजिजू म्हणाले, की भारत अद्याप विकसित नाही ही गोष्ट स्वीकारून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर लगेचच विकसित होण्याचे लक्ष्य निश्चित का केले नाही, त्या दृष्टीने प्रयत्न का झाले नाही, असे प्रश्न पडतात. भारतीय ‘गिफ्टेड’ आहेत. जगातील कोणत्याही देशातील नागरिकांच्या तुलनेत ‘इंटेलिजन्स’ जास्त आहे. जपान वगळता सर्व आशियाई देश एका पातळीवर होते. त्यानंतर भारताच्या तुलनेत चीनचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) पाचपट, तर सिंगापूरचे वीसपट झाले. आता देशातील कोणीही गरीब नसेल, देश दुसऱ्या देशावर अवलंबून नसेल, देशातील प्रत्येकजण आनंदी असेल, तेव्हा भारत विकसित होईल. २०४७मध्ये भारत स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करणार आहे. तोपर्यंत भारत विकसित देश झाला पाहिजे. ७५ वर्षांत जे होऊ शकले नाही, तर पुढील २२ वर्षांत साध्य करायचे आहे. विकसित भारत ही मोदींची गॅरंटी आहे. जी-२० देशांत भारत ही सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. देश विकसित होताना प्रत्यक्ष पाहता येणे तरुणाईचे सुदैव आहे.