पुणे : वाराणसीहून पुण्याकडे येणारे इंडिगोचे विमान कंपनीकडून अचानकपणे रद्द करण्यात आले. वाराणसीहून पहाटे ३ वाजता विमान पुण्याकडे निघणे अपेक्षित होते, मात्र विमानतळावर आलेल्या जवळपास २०० प्रवाशांना हे विमान रद्द झाल्याचे विमानतळावरच समजले. त्यावर प्रवाशांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांच्याशी संपर्क करीत मदतीसाठी विनंती केली. मोहोळ यांनी कंपनीला दुसरे विमान उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिल्याने तातडीने प्रवाशांचा प्रश्न मार्गी लागला.
हेही वाचा >>> पूजा खेडकरने ‘वायसीएम’ रुग्णालयातून अंपगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचे उघड
वाराणसीहून जवळपास २०० प्रवासी पुण्याकडे येत होते. या प्रवाशांनी रात्री १ वाजता वाराणसी विमानतळावर चेक इन केले. मात्र ऐनवेळी विमान रद्द करण्यात आले. प्रवाशांमध्ये लहान मुले, गर्भवती, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसह ह्रदयरोगाच्या रुग्णांचाही समावेश होता. ऐन मध्यरात्री विमानतळावरच थांबण्याची वेळ प्रवाशांवर आली. काही प्रवाशांनी थेट मोहोळ यांच्याशी संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला. त्यावर मोहोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पर्यायी विमान उपलब्ध करुन देण्याची सूचना केली. त्यावरही कंपनीनेही तातडीने पर्यायी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली. सर्व प्रवासी सोमवारी सकाळी दुसऱ्या विमानाने पुण्यात पोहोचले.
हेही वाचा >>> दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा उद्यापासून; विद्यार्थी नोंदणीमध्ये यंदा घट
याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, विमानातील काही प्रवाशांनी मला संपर्क केल्यानंतर संबंधितांना मी तातडीने पर्यायी विमान उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. शिवाय प्रवाशांची खाण्या-पिण्याची सोय करण्याचेही निर्देश दिले. त्याप्रमाणे स्थानिक प्रशासनाकडून ही सोयही प्रवाशांना करुन देण्यात आली.
कोणतीही पूर्वसूचना न देता आणि मध्यरात्रीच्या वेळी विमान रद्द केल्याने सर्व प्रवाशांमध्ये संताप होता. शिवाय कंपनीकडून काहीच उत्तर न मिळाल्याने आम्ही हवालदिल झालो होतो. त्याचवेळी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी तत्परता दाखवली आणि आमची पुण्याला येण्याची सोय झाली. – डॅा. शैलेश गुजर, प्रवासी