प्रत्येक उद्योजक नोकऱ्या, रोजगार देतो. देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करतो. प्रत्येक उद्योजकाकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागलो, तर देशात बाहेरून उद्योजक येणार नाहीत, नव्याने गुंतवणूक कशी येईल? असा प्रश्न केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केला.
माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने मुक्तछंद, घे भरारी आणि देआसरा फाउंडेशन यांच्या वतीने उद्योजकांसाठी विनामुल्य परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, की प्रत्येक उद्योग रोजगार देत असतो. तसेच, अर्थव्यवस्थेला मदत करत असतो. प्रत्येक उद्योजकाकडे वेगळ्या नजरेने पाहिल्यास परदेशातून भारतात उद्योजक येणार नाहीत, गुंतवणूक येणार नाही. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्यास माझ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि बँकांना तशाप्रकारच्या सूचना दिल्या जातील. ज्या उद्योजकांना कर्जासाठी अडचणी येत आहेत, त्यांनी त्रुटी दूर करून नव्याने अर्ज करावा.
दरम्यान, पत्रकार शशिकांत वारिशे यांना कधीच भेटलो नाही, त्यांच्याशी माझा संबंध नसून, त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेशी देखील माझा संबंध नाही. वारिशे मृत्यूप्रकरणी पोलीस चौकशी करत असून, सत्य बाहेर येईल, असे नारायण राणे म्हणाले.