पुणे : ‘दिवे घाट ते लोणंद आणि पाटस ते पंढरपूर या दोन्ही पालखी महामार्गांचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करा,’ अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केल्या. ‘कमी दराने निविदा भरून कामे मिळविताना घेतलेल्या कामांचा दर्जाही चांगला ठेवा,’ अशा शब्दांत गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना सुनावले.
गडकरी यांनी ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांबरोबर पालखी महामार्गाच्या विविध टप्प्यांच्या कामांचा आढावा घेत सूचना केल्या. प्रकल्प अधिकारी संजय कदम आणि इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. ‘ठेकेदार तुम्हाला चुकीची माहिती देतात. त्यांचे ऐकून तुम्ही मला चुकीची माहिती देत आहात. हे चालणार नाही,’ अशा शब्दांत गडकरी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना सुनावले. ‘काम करताना दर्जा खराब होणार नाही, याकडे लक्ष द्या,’ असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – पुणे : प्रशासन ऐकत नसल्याने भाजपचे मंत्री झाले हतबल ! म्हणाले…
‘पालखी महामार्गाचे उद्घाटन लवकर करायचे आहे. त्यासाठी दोन्ही पालखी महामार्गांची कामे त्वरित पूर्ण करा. मार्चपर्यंत या महामार्गाची सर्व कामे पूर्ण झालीच पाहिजेत,’ अशा सूचना गडकरी यांनी दिल्या. या बैठकीत, ‘धर्मापुरी ते लोणंद या पालखी महामार्गातील चौथ्या टप्प्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच, लोणंद ते दिवे घाट हा महामार्ग ७५ टक्के पूर्ण झाला आहे. तर, पाटस ते बारामती ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे,’ अशी माहिती ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर ठेकेदारांच्या अडचणीही गडकरी यांनी समजावून घेतल्या.
हेही वाचा – पुणे: शहराच्या मध्य भागातील वाहतुकीत आज बदल
‘कोंडी सोडविण्यासाठी सेवा रस्ता तयार करा’
‘हडपसर ते दिवे घाट या महामार्गाचे काम नुकतेच सुरू झाले असून, ते पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. हे काम करताना नागरिकांना वाहतुकीच्या अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) तयार करा. येत्या मे महिन्यापर्यंत हा रस्ता पूर्ण करा,’ अशा सूचनाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या.